प्रतिनिधी चित्रा न्युज
अकोला: पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे.
लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेता, त्यावेळी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्यानुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत धोरणात्मक निर्णय घेत पशुसंवर्धन विभागाची पदभरती जाहीर केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षकची ३७६ पदे, वरिष्ठ लिपीकची ४४ पदे, लघुलेखक (उच्चश्रेणी)ची ०२ पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) ची १३ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची ०४ पदे, तारतंत्रीची ०३पदे, यांत्रिकीची ०२, पदे, बाष्पक परिचरची ०२ पदे अशी एकूण ४४६ पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.दि.२७.०५.२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. पासुन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११.०६.२०२३ रात्री ११. ५९ वाजेपर्यंत आहे. या पदभरतीची जाहिरात पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यासाठी इच्छुकांनी https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००


0 टिप्पण्या