Ticker

6/recent/ticker-posts

आण्णांची भेट !ग्रेट भेट!!

आण्णांची भेट !ग्रेट भेट!!

      १५ऑगष्ट २०२३ला राळेगणसिद्धी जाऊन आण्णाची निवांत भेट घेतली.मला लोकांनी विचारलेले आक्षेपार्ह प्रश्न मी आण्णांना विचारले.
मी(शिवराम पाटील)...आण्णा , कांग्रेस ची केंद्रात सत्ता असताना तुम्ही आंदोलन केले.कांग्रेसला हाणून पाडले.भाजपला सत्तेवर आणले.आणि चूप बसले‌.लोकांचा आक्षेप आहे.
आण्णा.. लोकांना काय वाटते त्यापेक्षा मी काय केले,काय करू शकतो,ते महत्वाचे आहे.लोकांना काहीही बोलू द्या.आपण आपले काम करीत असावे.मला बरोबर वाटले, सर्व भारतीय जनतेला बरोबर वाटले.म्हणून तर आंदोलन मोठे झाले.
मी..लोकांचा आक्षेप आहे कि, तुम्ही २०११चे आंदोलन करून भाजपचे भले केले.तर भाजपविषयी विशेष आस्था आहे का?
आण्णा... सोपे आहे.तुम्हाला जर कांग्रेस विषयी आस्था असेल तर तुम्ही भाजपविरोधात आंदोलन का करीत नाहीत? मी कुठे अडवले? तुम्ही ते धाडस का करीत नाहीत? भयग्रस्त आहात.
मी..पण आण्णा तुम्ही आता शांत का?
आण्णा..मी कशाला? तुम्हीच शांत आहात.मला प्रश्न विचारून काय उपयोग?आधी मी तुम्हाला प्रश्न करतो.कि, तुम्ही भाजपच्या चुकीच्या धोरणांविरोधात का पेटून उठत नाहीत? आंदोलन का करीत नाहीत? तुम्हाला असे वाटते का, आंदोलन करणे आण्णांची नोकरी आहे,जे मी केलेच पाहिजे, नाहीतर पगार बंद होईल.
मी..लोक टिका करतात कि, तुम्ही शांत पहुडले आहात.
आण्णा.. तुम्हाला अशी टिका आवडत तर तुम्ही पण करा.मला काही फरक पडत नाही.फरक तुम्हाला पडतो.कळते मला.तुम्हाला खटकते.पण हिंमत नसल्याने तुम्ही काहीच करीत नाहीत.मला आंदोलन करायला सांगतात.
मी..आण्णा.तुम्ही आठ कायदे केले.तिच खरी गरज होती.हे त्यावेळच्या घटनाकारांच्या लक्षात का आले नसेल?
आण्णा..घटना लिहीणारे, अमलात आणणारे सत्तेत होते.जो सत्तेत असतो त्याला ही अडचण येत नाही.तशी अडचण सामान्य नागरिकांना येते.मी सामान्य नागरिक आहे.मला अडचण आली.मला राग आला.अरे,हे तर कायद्यात पाहिजे.मी कामाला लागलो.मी कायदे बनवून घेतले.जो  तलावात पोहोतो त्याला तहान लागत नाही.जो वाळवंटात राहातो , त्याला तहान लागते.घटना लिहीणाऱ्यांचे स्थान आणि माझे स्थान यात खूप मोठा फरक आहे.ते दिल्लीत बंगल्यात राहात होते.मी डोंगरात, खेड्यात, मंदिरात राहातो.तर मग गरज तर मला पडली.
आण्णा... तुम्ही उच्चशिक्षित नाहीत.तुम्हाला राजकीय, प्रशासकीय वारसा नाही.तरीही तुम्हाला कायदा बनवण्याचे कसे सुचले?
आण्णा... तुम्ही बालक आहात का?अडचण वाटली.गरज वाटली.त्या दिशेने कामाला लागलो.तर मला त्यातील खोच समजली.सैनिकाला यद्धात आपोआप मार्ग सापडतो.तसा मला या लढाईचा मार्ग सापडत गेला.माझे काम हाच माझा गुरु.तुम्ही आधी अशा कामाला तर लागा.ते काम तुमचे मार्गदर्शन करील.
आण्णा..लोक म्हणतात, आण्णांनी आता भाजप विरोधात आंदोलन करावे.
आण्णा..थांबा.थांबा.हा देश माझ्या एकट्याचा आहे का?तुमचा नाही का?लोकांचा नाही का? तर मीच का आंदोलन करावे?आणि तुम्ही लोकांनी फक्त टाळ्या वाजवायच्या का? आंदोलन यशस्वी होत गेले तर माझ्या सोबत यावे.नाही झाले तर चुका शोधत बसावे.अशा लोकांचा मी विचार करीत नाही.असे लोक जनहितासाठी प्रश्न करीत नाहीत.ते कोणत्यातरी स्वार्थापोटी प्रश्न करतात.
मी.‌.आण्णा,तुमचा वारस तुम्ही निवडला नाही.तर मग हे कार्य बंद करायचे का?
आण्णा...संपतीचा वारस, राजकीय वारस निवडायचा असतो.विचारांचा वारस स्वयंप्रेरणेने बनतो.ज्यांना माझे विचार,माझे कार्य आवडले असेल तो आपोआपच ते चालू ठेवील.तोच वारस समजावा.ही काही राजगादी नाही कि,येथे वारस नियुक्त करावा लागेल.असे राजगादीवर नियुक्त केलेले वारस किती लाथाड्या करतात, हाणामारी करतात,ते तुम्हांला इतिहास सांगतो.वर्तमान सुद्धा सांगते.
    आता तुम्ही येथे आलात.मी पत्र टाकले होते काय? नाही!मी फोन वर बोलवले होते काय? नाही! तरीही तुम्ही का आलात?ही आतून उर्मी असते.अंतर्प्रेरणा असते.तुम्हाला आवडले , तुम्हाला आतून उर्मी दाटून आली.म्हणून तुम्ही आलेत.इतर लोक लोनावळा, खंडाळा, माथेरान,उटी  जातात.तुम्ही येथे आलात,मला भेटायला.काहीतरी उर्मी असेल तरच ना! हिच उर्मी ,हिच प्रेरणा माणसाला कामाला लावते.तिकडे आपोआप पाय वळतात.आधी मन वळते मग तन वळते.
मी...आण्णाजी!मला जे जे शक्य आहे ते ते मी करतो.करीत राहिन.तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात.म्हणून मी अंतरीची ज्योत पेटती ठेवण्यासाठी तुमचे दर्शन घेतो.मार्गदर्शन घेतो.उलट सुलट प्रश्न करतो.तुमच्याकडून उत्तर हवे असते.माझ्या विचारांवर शिक्कामोर्तब करायचे असते.मी चूक कि बरोबर हे नक्की करायचे असते.मी गांधीजींना पाहू शकलो नाही.भेटू शकलो नाही.पण तुम्ही सुद्धा माझे गांधीजी आहात.म्हणून भेटलो.बोललो.तृप्त झालो.हिच माझी तीर्थयात्रा!
     अण्णाजी! नमस्कार!

.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या