चित्रा न्युज प्रतिनिधी
अहिल्यानगर :- साहित्यिकांनी समाजाला नवा विचार देण्यासोबत ऊर्जा देण्याचे कार्य केले, शोषित-वंचित-पीडितांच्या समस्यांना प्रभावीपणे समाजासमोर मांडले. आजदेखील शेतकरी-कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडताना साहित्यिकांनी समाज प्रबोधनावर भर द्यावा, असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
जामखेड येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मिठे, स्वागताध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, प्रकाशजी होळकर, डॉ. राजेश गायकवाड, अवधूत पवार, गीतकार बाबासाहेब सौदागर, डॉक्टर किसन माने, डॉ. चिन्मय घैसास, डॉ. विद्या काशीद, डॉ.जतीन भोस, डॉ.कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे म्हणाले, साहित्य आणि समाज यांचे नाते अतूट आहे. ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडणाऱ्या साहित्य निर्मितीमुळे समकालीन सामाजिक प्रश्न, लोकजीवन, लोकसंस्कृती, निसर्गसौंदर्य, शेतीचे प्रश्न समाजासमोर येतात. साहित्यातून समाजजीवन प्रतिबिंबित होते आणि मानवी जीवनाला दिशा मिळते. साहित्य नसेल तर जीवन नीरस होईल.
समाजातील विविध चळवळींना दिशा देण्याचे आणि शोषित-वंचितांच्या व्यथा मांडण्याचे कार्य साहित्याने केले आहे. नव्या लेखकांनीदेखील ग्रामीण भागातील वास्तव मांडणारे सडेतोड लेखन करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. राज्यस्तरीय साहित्य संमेलनासारख्या उपक्रमांमुळे नव्या दमाच्या लेखकांना प्रेरणा मिळेल, लेखनासाठी नवे विषय समोर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संमेलनाध्यक्ष विजयकुमार मिठे यांनी साहित्यिक व कवींनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी स्वागताध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, डॉ. राजेश गायकवाड, गीतकार बाबासाहेब सौदागर आदींचीही भाषणे झाली.
0 टिप्पण्या