चित्रा न्युज प्रतिनिधी
लोणावळा : वंचित बहुजन आघाडी, लोणावळा शहर आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती १४ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यंदाचा जयंती उत्सव अब्दुल शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
मध्यरात्री १२ वाजता समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांचा जल्लोष करत केक कापून जयंतीचे स्वागत केले. सकाळपासूनच विविध मिरवणूक मंडळे आणि भीम अनुयायांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. सर्व मंडळांचे व पाहुण्यांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत अन्नदानाचे आयोजनही करण्यात आले.
संध्याकाळी शोभायात्रेत 'राजगृह' या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थानाचा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मिरवणुकीत विविध मंडळांचा सहभाग लाभला आणि संपूर्ण वातावरण 'जय भीम'च्या घोषणांनी दुमदुमून गेले. या जयंती उत्सवामुळे लोणावळा शहरात सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.
0 टिप्पण्या