Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा महिला, बाल विकास सनियंत्रण समिती बैठक


बालकामगार ,बालभिक्षेकरी व शाळाबाह्य मुलांचे 
सर्वेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
छत्रपती संभाजी नगर:-जिल्ह्यातील बालकांना शिक्षण, आरोग्य, आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्व समावेशक प्रयत्न करावेत. त्यासाठी आधी बाल भिक्षेकरी, बालकामगार,शाळाबाह्य मुले यांचे सर्वेक्षण करण्यासाठी विशेष मोहीम  राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले
 महिला बालकल्याण विभागाची आढावा बैठक आज पार पडली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चीमंद्रे, जिल्हा बाल संरक्षण समितीच्या सदस्य ॲड. आशा शेरखाने,   जिल्हा परिषदच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी , महिला बालविकास सुवर्णा जाधव,महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर.  जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, बाल संरक्षण अधिकारी ,पोलीस विभागाचे संबंधित अधिकारी व महिला बालकल्याण विभागाअंतर्गत विविध समित्यांची समिती सदस्य या बैठकीस उपस्थित होते.
 जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे,त्यांची आरोग्य तपासणी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याबाबत सर्व समित्यांनी  समन्वयाने काम करावे. 
बालभिक्षेकरी, बालकामगार यांच्या हक्कासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या समन्वयाने पुढाकार घ्यावा असे,निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बैठकीत दिले.
 जिल्ह्यामध्ये बालविवाह प्रतिबंधाबरोबरच मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी    जाणीव जागृती करावी. ग्रामीण भागातील ग्रामसेवक ,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून मुलीच्या जन्माचे स्वागत करून मानसिकता बदल करण्यासाठी समुपदेशन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
 जिल्ह्यातील महिला बचत गटांना हिमरू शाल निर्मितीचे प्रशिक्षण देऊन "एक जिल्हा एक उत्पादन" या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे हिमरूशालीचे  उत्पादन वाढवण्यासाठी तसेच बाजारपेठ उपलब्धतेसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ व इतर विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या बचत गटांनी या संदर्भात नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. 
 बैठकीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, सखी वन स्टॉप सेंटर,. बालगृह, निरीक्षणगृह त्यांच्यामध्ये प्रवेशित बालकांची संख्या, महिलांसाठी अभयगृह, तात्पुरता निवारा, भरोसा सेल, विवाहपूर्व समुपदेशन केंद्र. बालकांसाठी सानुग्रह अनुदान योजना याबरोबरच केंद्र शासनाच्या महिला व बालकांसाठी  असलेल्या योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
 जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव या तालुक्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार, व्यसनधीनता व मुलीच्या जन्माचे प्रमाण कमी असल्याच्या विविध कारणांची विश्लेषणात्मक माहिती सादर करण्यात आली .येथे निरक्षरता प्रथा, परंपरा आणि व्यसनाधीनता यामुळे असे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले असून यावर समुपदेशन, उपाययोजनात्मक कार्यक्रम राबवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सुचित केले.
 विविध योजनांच्या अंमलबजावणी विषयीची सद्यस्थिती व उपाय योजना याचा आढावा जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चीमंद्रे ,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे यांनी समिती सदस्यांसमोर सादर केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या