चित्रा न्युज प्रतिनिधी
शिर्डी - सिंगापूर शहर शिक्षणक्षेत्रात अग्रेसर आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना सिंगापूरच्या धर्तीवर गुणवत्तापुर्ण, दर्जेदार व अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शिक्षण देण्याबरोबर त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वांना सहभागी करुन घेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
शिर्डी येथे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक चर्चासत्र, सिंगापूर अभ्यास दौरा, समृध्द अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रधान सचिव रणजितसिंग देओल, शिक्षण आयुक्त राहुल रेखावर, एमपीएससीच्या सहसंचालक सरोज जगताप, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, प्रकल्प संचालक संजय यादव आदी अधिकारी व विविध जिल्ह्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते
सिंगापूरचा अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ४८ शिक्षकांचे शिक्षणमंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केले. यावेळी शिक्षकांनी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अभ्यासदौऱ्यात आलेल्या अनुभवांचे सादरीकरण ऐकून घेतले.
श्री.भुसे म्हणाले , शिक्षण प्रणालीमध्ये देश, राष्ट्र व प्रथम देशाचा नागरिक घडविण्याला प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानासह त्यांना रोजगाराभिमुख व कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांनी सिंगापूरमध्ये विविध शाळेंना दिलेल्या भेटी व तज्ज्ञांच्या अनुभवाचा शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी निश्चितच होईल. महाराष्ट्राला सिंगापूरसारखी शिक्षणप्रमाणाली अनुसरण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिक्षण विभागाचया माध्यमातून शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील. तसेच शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी करुन ते सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
श्री.देओल म्हणाले, शिक्षकांनी सिंगापूरचा अभ्यासपूर्ण दौरा केला आहे. महाराष्ट्राला शिक्षण क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच विद्यार्थी नियमित शाळेत येण्यासाठी व त्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. शिक्षणविभाग निपुण ॲपसारख्या विविध ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
यावेळी सिंगापूर येथे शिक्षिकांचा अभ्यासदौरा व विविध शाळांना भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक घटकांचा सहा शिक्षकांच्या प्रत्येक गटाने सविस्तर माहिती सादरीकरणद्वारे दिली. तसेच शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या उपक्रमशील शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.


0 टिप्पण्या