चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी तालुक्यातील श्रीपतपिपरी रस्त्यावर दिनांक १७ मे रोजी रात्री घडलेल्या भीषण अपघातात चिखर्डे येथील शिवाजी तानाजी डुकरे (वय २८ वर्षे) हे युवक गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर भगवंत हॉस्पिटल, बार्शी येथे उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला असून त्यांनी टिपर चालकाच्या निष्काळजीपणाला या अपघाताला कारणीभूत ठरवले आहे.
शिवाजी डुकरे यांनी दिलेल्या जबाबात नमूद केले आहे की, "मी १७ मे रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता माझ्या MH13DR1307 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून चिखर्डे येथून श्रीपतपिपरी येथे विकलेल्या शेळ्यांचे पैसे घेण्यासाठी जात होतो. पानगाव-कोरफळे मार्गावरून जात असताना रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास श्रीपतपिपरीजवळील घाटणकरवस्ती परिसरात समोरून येणारा टिपर (वाहन क्र. MH09CU8759) कोणताही इशारा किंवा इंडिकेटर न दाखवता अचानक उजवीकडे वळला. त्यामुळे माझी मोटारसायकल थेट त्या टिपरला धडकली आणि मी रस्त्यावर कोसळून बेशुद्ध झालो."
शिवाजी पुढे सांगतात, "२२ मे रोजी मी शुद्धीवर आलो तेव्हा मला समजले की माझ्या डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले असून मी गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. अपघातानंतर किशोर गाडेकर आणि रामराजे ताकभाते (दोघेही राहणारा. श्रीपतपिपरी) यांनी मला खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल केले."
या अपघातात शिवाजी यांच्या मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातासाठी जबाबदार असलेल्या टिपरचा चालक मारुती शंकर मोहिते (राहणारा. उजगाव, तालुका. कागल, जिल्हा. कोल्हापूर) याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी डुकरे यांनी त्यांच्या जबाबात केली आहे.
दरम्यान, डोक्याच्या गंभीर दुखापतीमुळे डॉक्टरांच्या देखरेखीखाली डुकरे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक व आर्थिक संकट ओढवले आहे. परिसरातील नागरिकांनी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी चालकावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
0 टिप्पण्या