Ticker

6/recent/ticker-posts

१७ वर्षीय अल्पवयीन मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता

 

अज्ञात व्यक्तींविरोधात बार्शी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-बार्शी तालुक्यातील तुर्कपिंपरी गावात एका अल्पवयीन मुलीच्या बेपत्तीत प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय मुलगी घरात झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाली असून, अज्ञात व्यक्तींनी तिला फूस लावून पळवून नेले असावे, अशी शक्यता नातेवाइकांनी वर्तवली आहे. या घटनेबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 137(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 1 जून 2025 रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडली. पीडित मुलगी तिच्या कुटुंबीयांसोबत घरात झोपलेली होती. 2 जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा असल्याचे आढळून आले आणि संबंधित मुलगी बेपत्ता असल्याचे लक्षात आले. सुरुवातीला कुटुंबीयांनी गावामध्ये, नातेवाईकांकडे, तसेच ती शिक्षण घेत असलेल्या संजीवनी ज्युनियर कॉलेज मानेगाव येथे शोध घेतला, मात्र कुठेही तिचा थांगपत्ता लागला नाही.

बेपत्ता झालेल्या मुलीचे वय 17 वर्षे 5 दिवस असून ती रंगाने गोरी, उंची सुमारे 4.5 फूट, सडपातळ बांध्याची आहे. तिचे केस वेणीत असून डोळे काळे आणि नाक सरळ आहे. ती मराठी भाषिक असून घटनेच्या रात्री तिच्या अंगावर हिरव्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची लेगीज होती. तिच्या डाव्या पायाच्या पोटरीवर इंग्रजीत ‘2’ आणि त्यापुढे ‘LOVE’ या आकाराचे गोंदण कोरलेले आहे. दोन्ही कानात सोन्याचे टॉप्स आहेत.

ही घटना पोलीस ठाण्यात 2 जून रोजी रात्री 10:16 वाजता लेखी स्वरूपात नोंदवण्यात आली असून, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे अंमलदार पोहेकॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत प्राथमिक माहिती नोंदवण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, आणि नातेवाइक व मित्र-मैत्रिणींशी चौकशी करण्यात येत आहे.

या घटनेबाबत कोणीही संशयास्पद व्यक्ती किंवा माहिती पाहिल्यास किंवा काही तपशील ज्ञात असल्यास बार्शी तालुका पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुलीचा ठावठिकाणा लावण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सक्रिय झाली असून, लवकरात लवकर मुलगी सापडेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या