Ticker

6/recent/ticker-posts

राहुल गांधींचे विधान केवळ दिखावा ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका!

विधानसभा निवडणूक मतदाना संदर्भात १६ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी; ॲड. प्रकाश आंबेडकर करणार युक्तिवाद

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मतांच्या संख्येमध्ये आढळलेल्या अनियमिततांवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींवर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विट करत मतदानाची वाढलेली  आकडेवारी, त्यावरून ते करत असलेल्या न्यायालयीन लढाईची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा निवडणूक गोंधळाच्या मुद्द्यावर फक्त प्रसिद्धीपुरते बोलत आहे, प्रत्यक्षात कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते यांनी आधीपासूनच हा मुद्दा गांभीर्याने घेत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, पुढील तारीख १६ जून २०२५ रोजी ठेवण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना १२ डिसेंबर २०२४ रोजी पाठवलेल्या पत्रातून या प्रकरणाला वाचा फोडली होती. ज्यात खालील तीन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते - 

1. एका मतदाराला मतदानासाठी लागणारा वेळ किती?

2. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत झालेल्या मतदानाची नोंदणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे का?

3. ५:५९ वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना दिलेली टोकन अधिकाऱ्यांनी नोंदवली का?

या पत्रानंतरही राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे, १६ जानेवारी २०२५ रोजी वंचित आघाडीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून या मुद्द्यावर एकत्रित लढा देण्याची विनंती केली होती. मात्र, त्या पत्रालाही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे.

वंचित बहुजन आघाडीने या नंतर थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी चेतन चंद्रकांत अहिरे यांच्यावतीने दाखल केलेली रिट याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारली असून, या प्रकरणी निवडणूक आयोगास नोटीस पाठवण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारले आहे की, काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी हे प्रकरण न्यायालयात का नेले नाही? काँग्रेसकडे प्रचंड कायदेशीर यंत्रणा असतानादेखील त्यांनी न्यायालयीन मार्ग का निवडला नाही? यामागे कोणता हेतू आहे? असा प्रश्न विचारला आहे.

राहुल गांधींनी निवडणुकीतील अनियमिततेवर लेख लिहून केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला असून, प्रत्यक्ष कृतीपासून दूर राहिले आहेत. तसेच जातीयवादी माध्यमांकडूनही या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून केवळ राहुल गांधींच्या लेखाचे मोठे कवरेज दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या