चित्रा न्युज प्रतिनिधी
गोरेगांव:-शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या “फार्म टू कन्झ्युमर” (Farm to Consumer) संकल्पनेला साकार करण्याचा अभिनव पुढाकार पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि छोटू पटेल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य दर मिळतील, ग्राहकांना शुद्ध आणि दर्जेदार अन्नधान्य थेट शेतातून मिळेल, तसेच ग्रामीण भागात स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.
या उपक्रमांतर्गत धान्य प्रतवारी युनिट, तेलबिया प्रक्रिया करून शुद्ध घाणीचे तेल निर्मिती युनिट, पशुखाद्य उत्पादन युनिट, आणि सेंद्रिय खत निर्मिती युनिटची उभारणी करण्यात आली आहे.
कंपनी शेतकऱ्यांना बाजारपेठ, प्रशिक्षण, तंत्रज्ञान, तसेच उत्पादनाचे ब्रँडिंग आणि पॅकेजिंगसाठी मदत पुरवत आहे.
पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, घोटी (ता. गोरेगाव, जि. गोंदिया) यांच्या वतीने माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत या युनिट्सचा भव्य उद्घाटन सोहळा आणि शेतकरी मार्गदर्शन मेळावा ३० ऑक्टोबर रोजी कंपनीच्या परिसरात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नोडल अधिकारी विभागीय अंमलबजावणी कक्ष, नागपूर यांच्या प्रज्ञा गोळघाटे यांनी भूषविले. उद्घाटन आत्मा प्रकल्प संचालक अजित आडसुळे यांच्या हस्ते झाले. सहउद्घाटक म्हणून प्रज्ञा भोकरे (तहसीलदार, गोरेगाव) उपस्थित होत्या.
प्रमुख मान्यवरांमध्ये निलेश कानवडे, अनिकेत टाकरखेडे, महेंद्र ठोकळे, लालन राजपूत, रामेश्वर पिपरेवार, एच. व्ही. गौतम, आणि तेजस्वरी टेकाम यांचा समावेश होता.
या प्रसंगी आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, आणि मूल्यवर्धनाबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
माननीय सुरेंद्र बिसेन (अध्यक्ष, पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.) यांचे मनोगत:
> “पोंगेझरा कंपनीची स्थापना ही केवळ व्यवसायासाठी नसून, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आहे.
छोटू पटेल कंपनीसोबतच्या सहकार्यातून ‘फार्म टू कन्झ्युमर’ ही संकल्पना साकारली असून, शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेपर्यंत पोहोच मिळत आहे.
आमचे ध्येय — आत्मनिर्भर शेतकरी आणि समृद्ध गाव.
सरकार व कृषी विभागाच्या सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.


0 टिप्पण्या