Ticker

6/recent/ticker-posts

आपत्ती आली तरी घाबरायचं नाही…!

परभणीत जिल्हयात शालेय विद्यार्थ्यांना
आपत्ती व्यवस्थापनाचे धडे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
परभणी :-  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, परभणी)  संजयसिंह चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली फॅमेक्स  कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पथकाद्वारे परभणी जिल्हयात शालेय आपत्ती व्यवस्थापनावर प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

जिल्हयातील शालेय विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना आपत्तीवर कशी मात करायची याचे प्रशिक्षण दिले जात आहे. 

फॅमेक्स कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यात दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल  पथकातील प्रशिक्षित जवानांमार्फत जिल्ह्यात शालेय आपत्ती व्यवस्थापन विषयावर प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. सदर पथकात एक अधिकारी व 15 जवान यांचा समावेश असून टीम कमांडर श्री. यादव हे सदर पथकाचे नेतृत्व करीत आहेत.

आतापर्यंत जय जवान जय किसान माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, लिमला, ता. पूर्णा, राजमाता जिजाऊ भोसले विद्यालय, पालम, ममता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गंगाखेड या शाळांमधील सुमारे 1 हजार 722 विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

सदर कार्यक्रमाअंतर्गत शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शालेय कर्मचारी यांना विविध आपत्ती परिस्थितीमध्ये घ्यावयाच्या खबरदारी उपाययोजना, आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या वेळी करावयाच्या कृती, सुरक्षित स्थलांतर, प्राथमिक उपचार, मॉक ड्रिल तसेच आपत्ती नंतर घ्यावयाच्या उपाययोजना याबाबत प्रत्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रस्तुत प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील एकूण 10 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांचा समावेश आहे.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्तीविषयक जागरूकता वाढून आपत्कालीन परिस्थितीत स्वतःची व इतरांची सुरक्षितता कशी राखावी याचे ज्ञान प्राप्त होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली व संबंधित शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

फॅमेक्स कार्यक्रमांतर्गत एनडीआरएफ पथकाद्वारे राबविण्यात येणारा हा उपक्रम जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या