चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा : दिव्यांग व्यक्तींच्या कुटूंबाकडून दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाचा सहज स्विकार, त्यामुळे त्यांना प्राप्त होणारे कौटूंबिक, भावनिक, मानसिक आणि सामाजिक स्थैर्य विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सन राबविण्यात येत आहे. सदर योजनेत कालानुरुप बदल करुन दिव्यांग-दिव्यांग हा पर्याय नव्याने समाविष्ट करण्यात आलेला असून या योजनेची अंमलबजावणी 18 डिसेंबर 2025 पासुन लागु करण्यात आली आहे.
योजनेंतर्गत दिव्यांग-अव्यंग विवाह करणाऱ्यास 1 लाख 50 हजार रुपये व दिव्यांग-दिव्यांग विवाह करणाऱ्या दाम्पत्यास 2 लाख 50 हजार रुपयाचे अनुदान पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. त्यापैकी 50 टक्के रक्कम संबंधित दाम्पत्याने 5 वर्षाकरीता मुदत ठेवीमध्ये ठेवावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी वधू व वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधारसंलग्न वैध वैश्विक ओळखपत्र आवश्यक आहे. दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा तसेच वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशिररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. विवाह झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांगांकडे आधार संलग्न व वैध वैश्विक ओळखपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, पती व पत्नीच्या आधार संलग्न संयुक्त बँक खात्याचा सविस्तर तपशिल असणे आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी कळविले आहे.


0 टिप्पण्या