वनविभागाची आयपीएल मॅच सुरू
रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली: -तालुक्यात नरभक्षक वाघिणीने चौकार मारला असून वनविभाग आता अडचणीत सापडलेला आहे. तालुक्यातील नागरिक आता वनविभागच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर वरचढ झाले असून कर्मचारी आणि अधिकारी दहशतीत आले आहेत. नरभक्षक वाघिणीने आतापर्यंत चौघांवर हल्ला केल्याने सध्या नरभक्षक वाघिणीने चौकार मारला असून वन्यजीव विभागाची आयपीएल मॅच सुरू असल्याचे दिसून येते. साकोली तालुक्यात केवळ २६ दिवसात ही चौथी घटना असून आज पहाटे वीरसी गावा लगतच्या विटा भट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीवर वाघाने हल्ला केल्याने चिमुकली गतप्राण झाली.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पच्या बफर झोनमध्ये वाघिणीचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास साकोली तालुक्यातील वीरसी येथे एका ५ वर्षाच्या मुलीला वाघिणीने झोपेतून उचलून नेले आणि ठार केले. आशिका काशिनाथ मिरी असे या दुर्दैवी बालिकेचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि तनावाचे वातावरण पसरलेले आहे. छत्तीसगड राज्यातील जिल्हा बलोदा बाजार अंतर्गत सुहेला येथील रहिवासी काशिनाथ मिरी हे आपल्या कुटुंबासह वीरसी येथील संजय कापगते यांच्या शेतात विटाभट्टीवर कामासाठी आले आहेत. रोजच्या प्रमाणे कुटुंब झोपलेले असतांना पहाटे ५ वाजता दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक हल्ला केला. काही कळण्याच्या आतच वाघिणीने पाच वर्षाच्या चिमुकलीला जबड्यात पकडून ओढून नेले आणि क्षणात ठार केले.
____________________________________________
वाघीणच्या शोधासाठी १७० कर्मचाऱ्यांची फौज
रणरणत्या उन्हाचा पारा चढतीवर आहे. १५ एप्रिल नंतरची ऊन्ह आता घामाच्या धारा वाहू लागली आहे. असे असतांना नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट अरण्यात सध्या वेगळाच थरार अनुभवायला मिळत आहे. टी-27 या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे १७० हून अधिक कर्मचारी जीवाची बाजी लावून तैनात असतांना वीरसी येथे वाघाने हल्ला केल्याची चौथी घटना घडली. गेल्या २६ दिवसापासून ही चतुर वाघीण वनविभागाच्या हातावर तुरी देऊन जंगलाच्या कानाकोपऱ्यात हुलकावणी देत आहे. रखरखत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असतांनाही वनविभागाचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता या हिंस्र श्वापदाचा मार्ग शोधत आहे हे विशेष. १९ मार्च २०२६ रोजी वसंत मेश्राम यांच्यावरील पहिल्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले. त्यानंतर २८ मार्च २०२६ रोजी माया सोनवाने यांचा बळी गेला. तर १ एप्रिल २०२६ रोजी छाया मूंगमोडे यांना गंभीर जखमी करत या वाघिणीने नरभक्षक रूप धारण केल्याचे स्पष्ट झाले. आज १५ एप्रिल उजाडले तरी ही वाघीण हाती लागली नाही. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभाग, वन विकास महामंडळ, प्रादेशिक विभाग आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस जंगलाचा कानाकोपरा पालथा घालित असून सध्या या विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे.
______________________________________________
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
सध्या नागझिरा नवेगाव वनपरिक्षेत्रात तणावपूर्ण शांतता असून २६ दिवसापासून सुरू असलेला हा वन्य प्राणी आणि माणसाचा संघर्ष कधी संपतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. उमरझरीच्या घटनेनंतर त्या परिसरात परिसरात मोठे फलक लावून जन जागृतीचा वेग वाढविण्यात आला असून वाघिणीला जेरबंद करेपर्यंत ही मोहीम थांबणार नाही असा निर्णय वन विभागाने घेतलेला आहे. वनविभागाने वाघिणीला एका जागी स्थिर करण्यासाठी आणि तिची भूक शमविण्यासाठी जंगलात ८ विविध ठिकाणी ' बेट ' ('रेडको आणि बकरे ) बांधलेले आहेत. तांत्रिक गणितानुसार वाघीण भक्ष्य खाण्यासाठी तिथे येईल आणि त्यानंतर तिला डार्ट करून बेशुद्ध करने सोपे जाईल अशी योजना होती. मात्र ही वाघीण अत्यंत बुद्धिमान असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वाघिणीसाठी ठेवलेले दोन भक्ष्य चक्क बिबट्यांनी फस्त केल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलेले आहे. यामुळे वनविभागाच्या रणनितीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जंगलात वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ९० अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. उमरझरी, बामपेवाडा, शिवनटोला आणि निपरटोला या गावालगाच्या भागात ही वाघीण सातत्याने आपले स्थान बदलत असल्याचे दिसून आलेली आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या ( एसटीपीएफ ) ३०-३० जणांच्या ३ तुकड्या डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. सोबत आरआरटीचे ३० जवान २४ तास सज्ज आहेत.
_______________________________________________
वाघ हा निसर्गातील सर्वात बुद्धिमान शिकारी आहे. केवळ विपरीत परिस्थितीच तो मानवावर हल्ला करतो. संबंधित वाघिणीला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी वनविभागाची संपूर्ण यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करीत आहे. ही मोहीम अत्यंत संवेदनशील असल्याने नागरिकांनी संयम राखावा आणि वन विभागाच्या सूचनाचे तंतोंत पालन करावे.
प्रीतमसिंग कोडापे.
उपसंचालक एनएनटीआर


0 टिप्पण्या