Ticker

6/recent/ticker-posts

खासदार डॉ.अजित गोपछडे व हुडको यांच्या पुढाकारातून नांदेड मनपा शाळांचा कायापालट; शालेय फर्निचरचे थाटात लोकार्पण


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड :- खासदार डॉ.अजित गोपछडे आणि हुडको (HUDCO) यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR Fund) नांदेड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शालेय फर्निचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या फर्निचरचा लोकार्पण सोहळा दिनांक २९.०४.२०२६ रोजी पालिकेच्या शाळा क्र.०१, गांधी पुतळा, वजिराबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना नांदेड महानगरपालिकेच्या शाळांमधील भौतिक सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने *खासदार डॉ.अजित गोपछडे* यांनी *हुडकोकडे* पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, हुडकोच्या वतीने *पालिकेच्या 11 शाळांना एकुण 550 आधुनिक बाक (Benches)* आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा बसण्याचा प्रश्न सुटणार असून त्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळणार आहे.

या सोहळ्याला खासदार डॉ.अजित गोपछडे यांच्यासह महापौर सौ.कविता संतोष मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, शिक्षण व महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा वैजु सोनी पाटील, उपसभापती निरंजना राजू लांडगे, सभागृह नेता ॲड.महेश कनकदंडे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अजिजित वायकोस, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, महानगरपालिकेचे स्थानिक नगरसेवक, शिक्षण विभागाचे अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*खासदार डॉ.अजित गोपछडे यांचे मनोगत*
यावेळी बोलताना खासदार डॉ.अजित गोपछडे म्हणाले की, "महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांप्रमाणेच आधुनिक सोयीसुविधा मिळाव्यात, हे आमचे ध्येय आहे. हुडकोने दिलेल्या या योगदानामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नक्कीच बळ मिळेल.भविष्यातही नांदेडमधील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." त्याचप्रमाणे शहरातील होतकरु गरजु विद्यार्थ्यांचे आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी व त्यांना व्यायामाची चांगली सवय जडण्यासाठी पालिकेतील प्रत्येक शाळेत ओपन जीम तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ.मशिन्स उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा करताना प्रत्येक शाळेत दोन संगणक संच उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन यावेळी खासदारांनी दिले आहे.

*नांदेडकरांकडून स्वागत* 
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रथमच अशा प्रकारचे दर्जेदार आणि सुसज्ज फर्निचर उपलब्ध झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. खासदारांच्या या विशेष प्रयत्नांमुळे शाळांची पटसंख्या वाढण्यासही मदत होईल, असा विश्वास शिक्षण प्रेमींनी व्यक्त केला आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या