बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारासमोर आंदोलन; प्रशासनाच्या दुर्लक्षाने नागरिक संतप्त, अपघातांचे सत्र थांबेना
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारासमोरील जीवघेण्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. सततचे अपघात आणि चौकातील गोंधळ लक्षात घेता येथे तातडीने ट्रॅफिक सिग्नल बसवावा, या मागणीसाठी सोमवारी सायंकाळी काँग्रेस, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाविरुद्ध जोरदार एल्गार पुकारला.
नागपूर-चंद्रपूर हा वर्दळीचा महामार्ग भद्रावती शहराच्या मुख्य चौकातून जातो. महामार्गावरून जड वाहनांची सतत ये-जा असते. मुख्य चौकातून नागरिकांना आणि वाहनचालकांना कसरत करत रस्ता ओलांडावा लागतो. या चौकात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
सोमवारी सायंकाळी 6 वाजता झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे विनय अंबारे यांनी केले. माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, माजी नगराध्यक्षा सरिता सुर यांच्यासह अनिल पडोळे, प्रथम गेडाम, उषा जाधव, पल्लवी तामगाडे, सीमा पवार, कल्पना भुसारी, कल्पना मत्ते या नगरसेवक-नागरिकांनी सहभाग घेतला. हातात फलक घेऊन नागरिकांनी "ट्रॅफिक सिग्नल झालाच पाहिजे" अशा घोषणा दिल्या.
आंदोलकांनी प्रशासनाला कडक इशारा दिला की, लवकरात लवकर प्रवेशद्वारासमोर ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
------------ बॉक्स---------
भद्रावतीकर रस्त्यावर! नागपूर-चंद्रपूर हायवेवर जीवघेणी कोंडी. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारावर सिग्नलच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन. "अपघात थांबवा, सिग्नल द्या" नागरिकांची मागणी.


0 टिप्पण्या