आशा,पोषण आहार व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रोश
प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : आशा, गटप्रवर्तक,शालेय पोषण आहार कर्मचारी,अंगणवाडी सेविका आणि कृषी मित्र यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना व शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता आझाद बगिचा चंद्रपूर येथून दे धडक मोर्चा काढून चंद्रपूर जिल्हा परिषद गेटसमोर रोड वरच विशाल धरणे आणि तीव्र निदर्शने आणि त्यानंतर जेल भरो आंदोलन करताना 1 तास रास्ता रोको आयटक चे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे पाटील, माजी नगरसेवक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ राजू गैनवार -- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ रवींद्र उमाटे, , निकिता नीर, किरण धोंगडे,ममता भिमटे, सुहासिनी वाकडे, श्रीधर वाढइ यांच्या नेतृत्वात करण्यात आले .
आशा व गटप्रवर्तकांच्या, शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या मागण्यांसाठी देशभर देशव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून चंद्रपूर येथे हे आंदोलन करण्यात आले आहे. 20 14 पासून केंद्र सरकारने आशा व गटप्रवर्तकांच्या तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या मोबदल्यात वाढ केलेली नाही. त्यामुळे तातडीने मानधन वाढ लागू करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
आशा व गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करावे, पेन्शन योजना लागू करावी, गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, ग्रॅज्युइटी, पीएफ, किमान वेतन व इतर कायदेशीर सेवा लाभ लागू करावेत, तसेच दर महिन्याच्या १० तारखेपूर्वी नियमित मोबदला अदा करावा आणि सेवानिवृत्तीचे लाभ तातडीने देण्यात यावेत, दीपावली भाऊबीज भेट द्यावी, गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्यावा , शालेय पोषण आहार कर्मचारी यांना चपराशी कम कूक या पदावर नियुक्त करावे. त्यांना पेन्शन व सामाजिक सुरक्षा लागू करावी. कृषी मित्र यांना सेवेत कायम ठेवून त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
शालेय पोषण आहार कर्मचारी यांना 1 एप्रिल 2024 पासूनचे थकीत मानधन ₹5,000 मासिक मानधन तात्काळ अदा करावे आणि दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यांना जिल्हा परिषद सेवेत कायम करून किमान वेतनानुसार ₹ 26 हजार मासिक वेतन, प्रसूती रजा व इतर शासकीय सेवा लाभ देण्यात यावेत, अशी मागणी आहे.
कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास सहाय्यता निधी, सामाजिक सुरक्षा व पेन्शन योजना लागू करावी, तसेच वारसांना सेवेत सामावून घेण्याची योजना लागू करावी. गणवेश व ओळखपत्रासाठी दरवर्षी निधी थेट खात्यात जमा करावा आणि अद्याप गणवेश व ओळखपत्र न मिळालेल्यांना ते तातडीने देण्यात यावे, अशाही मागण्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
आंदोलनानंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा, गट प्रवर्तक यांना योग्य मोबदला, मानधन, सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर सेवा लाभ मिळावेत, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील आशा, गटप्रवर्तक ,शालेय पोषण आहार कर्मचारी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, कृषी मित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ.प्रकाश रेड्डी, कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन, कॉम्रेड मल्लेश टमटम, सविता गटलेवार ,मीना चौधरी, शालू लांडे, वर्षा घुमे, ज्योत्स्ना ठोंबरे,सखू खोके, कॉ. किशोर निंब्रड,राहुल पांडव,शरद भानारकर, गोलू दरवे, मोहित शेंद्रे यासह अन्य आयटक पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या