चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : भंडारा शहरापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरंभी (देवी) ग्रामपंचायतीमध्ये रविवारी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ग्रीन हेरिटेज सामाजिक पर्यावरण संस्था व ग्रामपंचायत कोरंभी (देवी) यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन सीड-बॉल व प्रधानमंत्री जल समृद्धी जनभागीदारी अभियानांतर्गत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
ग्रीन हेरिटेज संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत माँ शारदा योग वर्ग (संत कबीर वॉर्ड) आणि सहेली महिला बचत गट (शास्त्री नगर), भंडारा येथील महिलांनी घराघरातून आंबा, जांभूळ, कडुनिंब, करंज व चारोळीच्या बिया संकलित करून मोठ्या प्रमाणात सीड-बॉल तयार करीत संस्थेच्या स्वाधीन केले होते.माती व शेणखतापासून तयार करण्यात आलेले हे जीवनदायी बीज संस्थेचे संस्थापक मोहम्मद सईद शेख व लियाकत खान यांनी 27 ऑगस्ट ला कार्यक्रमात ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केले.
ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सरपंच श्रीमती कुसुम कांबळे,उपसरपंच श्रीमती श्रद्धा लुटे व ग्रामपंचायत अधिकारी श्री आर.जे. साठवणे यांनी सीड-बॉल स्वीकारले. यानंतर कार्यालय परिसरात त्यांचे रोपण करण्यात आले. उर्वरित सीड-बॉल गावातील पडीक परिसर व डोंगराळ भागात विखुरण्यात येणार असून, पावसाळ्यात त्यांचे अंकुरण होऊन परिसरात हिरवाई निर्माण होणार आहे.
प्रधानमंत्र्यांच्या "कॅच द रेन" आवाहनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवत आहे ग्रीन हेरिटेज
यावेळी संस्थेचे संस्थापक सईद शेख म्हणाले, "आज लावलेले प्रत्येक बीज उद्या ऑक्सिजन, फळे, सावली तसेच हजारो पक्ष्यांसाठी आश्रयस्थान बनेल. सीड-बॉल हा सर्वात सोपा आणि स्वस्त वृक्षारोपणाचा मार्ग आहे. तसेच जल आहे तर उद्याचे भविष्य आहे—जलसंवर्धन ही आजची सर्वात मोठी गरज आहे."
सरपंच कुसुम कांबळे यांनी प्रास्ताविकात ग्रीन हेरिटेजच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, हा उपक्रम पर्यावरण व जलसंवर्धन या दोन्हींसाठी मैलाचा दगड ठरेल. ग्रामपंचायत अधिकारी आर. जे. साठवणे, श्रद्धा लुटे, लियाकत खान आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र तुमसरे, पूनम वनवे, निकेश चुंभरे, सुरेखा वनवे, राणी नागदेवे, आशिष नागदेवे, अश्विन चांदेकर, मृणाली चुंभरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन लियाकत खान यांनी केले, तर आभार ग्रामपंचायत अधिकारी आर. जे. साठवणे यांनी मानले.


0 टिप्पण्या