भूमाफिया अरुण मोटघरे सह ६ जणांचा प्रताप
लाखनी तहसीलदार महेश शितोळे यांचेकडे तक्रार
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
भंडारा :- उपजाऊ शेतजमीन निवासी प्रयोजनार्थ करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असल्या तरी यास लाखनी येथील भूमाफिया ने बगल देऊन नगररचना विभागाचे बनावट दस्ताऐवज, शिक्का तथा अधिकाऱ्याची खोटी स्वाक्षरी करून नियमबाह्य शेतजमीन अकृषक केल्याचा अफलातून प्रकार माहिती अधिकाराने उघडकीस आल्यामुळे भूमाफिया अरुण माधोराव मोटघरे, शारदा अरुण मोटघरे, ऋषभ अरुण मोटघरे तिघेही राहणार बस स्थानकाजवळ लाखनी, अजहर जफर शेख, जफर अली मजहर अली शेख दोघेही राहणार प्रभाग क्रमांक ०८ लाखनी आणि मुनाफ आबीद छव्वारे पोहरा, तालुका लाखनी यांचेवर शेतकऱ्यांसह शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून अकृषक आदेश रद्द करावे. याकरिता सामाजिक कार्यकर्ता डॉ. दीपराज इलमकर यांनी लाखनी तहसीलदार महेश शितोळे यांचेसह जिल्हा महसूल प्रशासनाकडे तक्रार केली आहे. प्रशासनाकडून या भूमाफिया वर काय कारवाई केली जाते. याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
अरुण मोटघरे आणि इतर ६ व्यक्ती हे शेतजमिनीची खरेदी विक्री करून त्यावर भूखंड(प्लॉट) तयार करून विक्री चा व्यवसाय करतात. त्यांनी दिलीप काशिनाथ चोले, रा. मुरमाडी/सावरी, तालुका लाखनी यांची शेतजमीन मौजा मुरमाडी/सावरी तलाठी साझा क्रमांक ०५ येथील गट क्रमांक ३५८/१ आराजि ०.३९ हेक्टर आर जागा निवासी प्रयोजनार्थ अकृषक करण्याकरिता तहसीलदार लाखनी यांचेकडे १६ ऑक्टोबर २०१८ ला विहित नमुन्यात अर्ज सादर केला होता. पण नगररचना कार्यालय भंडारा येथे नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव सादर न करता शेतकऱ्याचे नावाने नगररचना विभागाचा बोगस व बनावटी पत्र क्रमांक अकृषक/मंजुरी/मौजा-मुरमाडी/सा./नरभं/६५४ दिनांक ३१/०५/२०२१ तयार केला असून अभियंत्याकडून तयार केलेल्या चुकीच्या नकाशावर नगररचना विभागाचा सरकारी खोटा शिक्का मारून त्यावर खापर्डे आडनावाच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी करून पुढील कार्यवाहीस्तव तहसीलदार लाखनी यांचेकडे सादर करून चुकीच्या निवासी प्रयोजनार्थ रा.मा.क्र. ०९/एन.ए.पी.-३४/२०१८-१९ दिनांक १५ जुलै २०१९ ला अकृषक आदेश भूमाफिया अरुण मोटघरे आणि कंपनी ने प्राप्त करून घेतला. या बाबद माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत नगररचना कार्यालय भंडारा यांना विहित नमुन्यात अर्ज देऊन गट क्रमांक ३५८/१ बाबद च्या तात्पुरत्या रेखांकनास आखनीची-अंतिम मंजुरीची शिफारस केलेल्या नकाशाची माहिती व ३१ मे २०१९ च्या पत्राबाबद माहिती देण्याची विनंती केली असता नगररचना कार्यालयाच्या अभिलेखात सदर माहिती उपलब्ध नसल्याचे पत्र क्रमांक ८२१ दिनांक ६ जून २०२२ नुसार संबंधित नगररचना कार्यालयाने कळविले असल्यामुळे अकृषक प्रस्तावासोबत जोडलेले ३१ मे २०१९ रोजी चे पत्र बनावट असल्याच्या बाबीस बळ मिळते.
असाच प्रकार ओमशंकर पतीराम चेटूले रा. केसलवाडा/वाघ यांचे बाबतीतही घडल्याचे दिसून येते. त्यांचे मालकीची केसलवाडा/वाघ येथील गट क्रमांक ५४०/३ आराजी ०.९९ हेक्टर आर पैकी ०.४९.५० हेक्टर आर(४ हजार ९५० चौमी) शेतजमीन निवासी प्रयोजनार्थ अकृषक करण्यासाठी अरुण मोटघरे आणि कंपनीने तहसीलदार लाखनी यांचेकडे ८ जून २०१६ ला अर्ज केला होता. त्यात असेच नगररचना कार्यालयाचे बनावटी दस्ताऐवज सादर करून ८ मार्च २०१७ ला अकृषक आदेश पारित करून घेतला. या वरून हे भूमाफिया मागील अनेक वर्षापासून शेती विकत घेणे. त्यावर भुखंड तयार करून विक्री चा गोरखधंदा करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांशी शेतजमिनीचा सौदा झालेला नाही. अशा लोकांना निवासी प्रयोजनार्थ अकृषक आदेश मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये घेऊन खोटे अकृषक आदेश उपलब्ध करून देऊन वाम मार्गाने पैसा कमावण्याचा त्यांचा धंदा आहे. यात महसूल कर्मचाऱ्यांपासून अधिकारीही लिप्त असल्याचे तहसीलदार लाखनी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने तहसीलदार काय भूमिका घेतात. याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
*तहसीलदाराकडून कारणे दाखवा नोटीस*
अकृषक आदेश नसतांनाही शेतजमीन गैरकायदेशीर रित्या अकृषक करून घेतल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयास प्राप्त होणारा लाखो रुपयांचा अकृषक महसूल बुडविला असल्यामुळे कायदेशीर कारवाई करावी. या करिता डॉ. दिपराज इलमकर यांचे प्राप्त तक्रारीवर तहसीलदार लाखनी यांनी अरुण मोटघरे यांचेसह इतर ६ व्यक्तींना तक्रारीनुसार मुद्देनिहाय लेखी स्पष्टीकरण दस्ताऐवजासह सादर करण्याबाबद कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे.


0 टिप्पण्या