Ticker

6/recent/ticker-posts

हवामान खात्याचे भाकीत खरे ठरले, तालुक्यात संततधार


१२ जुलै ५३.४० तर १३ जुलै रोजी ५९.४० मिमी पावसाची नोंद 

नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा


भंडारा :- लाखनी तालुक्यात ११ जुलै पासून पावसाने सुरुवात केली असून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. १२ व १३ जुलै रोजी अनुक्रमे ५३.४० व ५९.४० मिलिमीटर पावसाची नोंद तालुका प्रशासनाने केली आहे. त्यामुळे चुलबंद नदीला पूर येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर रोवणीस जोमात सुरुवात झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यास तालुका प्रशासन सज्ज आहे. 
         साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र २८ हजार ५५५ हेक्टर असून खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २४ हजार ६९० हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगाम २०२२ मध्ये २२ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येणार असून २१ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रात रोवणी तर ६९८ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड करण्यात येणार आहे. धानाची पेरणी जवळपास पूर्ण झाली असून २० ते २५ टक्के रोवणी झाली असल्याचा अंदाज पंचायत समिती चे कृषी अधिकारी एम.के. जांभूळकर यांनी वर्तविला आहे. १ जून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत लाखनी तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १११०.४० मिलिमीटर आहे. तर १ जून ते १३ जुलै पर्यंत सरासरी ४२१ मिलिमीटर पाऊस पडतो. याच कालावधीत मागील खरीप हंगाम २०२१ मध्ये ४४८.९० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. तर चालू खरीप हंगामात ३५४.२० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून सरासरी ८४ टक्के पाऊस झाला आहे. हवामान खात्याने ११ ते १४ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. १२ जुलै व १३ जुलै रोजी अनुक्रमे ५३.४० व ५९.४० मिलिमीटर पावसाची तालुका प्रशासनाने नोंद केल्यामुळे हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. 
         तालुक्यातून चुलबंद नदी प्रवाहित होत असून मिरेगाव, सोनमाळा, भूगाव, मेंढा, विहीरगाव, खराशी, लोहारा, नरव्हा, पाथरी, मरेगाव इत्यादी गावे नदीकाठावर असून या गावातील लोकांना तालुका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास पूर परिस्थिती चा सामना करण्यास तालुका प्रशासन सज्ज आहे. चालू खरीप हंगामात रोहिणी व मृग कोरडाच गेला. आद्रा नक्षत्राचे सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्याने पेरणीस सुरुवात झाली. तर ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी रोवणीही सुरू केली होती. पुष्य नक्षत्रात संततधार पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणी जवळपास आटोपली आहे. तर रोवणीस जोमाने सुरुवात झाली असल्याचे पंचायत समिती चे कृषी अधिकारी एम.के. जांभूळकर यांनी सांगितले. या वेळी कृषी विस्तार अधिकारी के.एन.चव्हाण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या