स्पर्धेतील विजेत्यांचा पुरस्काराने गौरव
दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्राचे वितरण
सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
वर्धा : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संविधान दिन ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून समता पर्व साजरा करण्यात आला. आज सामाजिक न्याय भवन येथे या पर्वाचा शुभारंभ झाला. यावेळी विद्यार्थी, लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र, धनादेशाचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त शरद चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिकारी रोहिणी काळे, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंदु पोपटकर, विशेष अधिकारी अनिल वाळके उपस्थित होते.
समता पर्व अंतर्गत निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशपाल ढोबळे यांना प्रथम क्रमांकाने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. वर्धा तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्राचे वाटप सुध्दा करण्यात आले.
यावेळी प्रसाद कुळकर्णी यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांबाबत विद्यार्थी व उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. सामाजिक न्याय विभागांतर्गत वर्धा जिल्ह्याची यशोगाथा पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन एम.पी.बनकर यांनी केले तर आभार अनिल वाळके यांनी मानले. कार्यक्रमास कर्मचारी, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त शासकीय वसतिगृहातील गृहपाल व विद्यार्थी, शासकीय निवासी शाळा येथील मुख्याध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


0 टिप्पण्या