◻️जिल्हाधिकारींना सुद्धा तक्रार पत्र दिले • उपनिबंधकांनी काढले फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तात्काळ आदेश पत्र • प्रकरण लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे •
चित्रा न्यूज / विशेष प्रतिनिधी
भंडारा ०२ जुलै : साकोली व सानगडी शाखेतील सुमारे ६८ खातेदारांनी स्वाक्षऱ्यांसह १ महिन्यांपूर्वी ३ जूनला भंडारा येथे जिल्हा उपनिबंधकांना पैसे परत मिळावे म्हणून निवेदन दिले होते. त्यावर १ महिना लोटला. अद्यापही पैसे मिळाले नसल्याने आज ( गुरू. ०२ जुलै ) ला सुमारे शंभरहून अधिक साकोलीतील खातेदार पुन्हा भंडारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात संतप्त होत धडक दिली व दुसरे स्मरणपत्र सादर करीत तेच पत्र जिल्हाधिकारींना सुद्धा दिले. तर यावर आता जिल्हा निबंधकांनी थेट आदेश पत्रच काढून सात दिवसात बॅंकेने सर्व खातेदारांना पैसे देण्याचे आदेश दिले अन्यथा संचालक मंडळांवर फौजदारी कारवाईचे संकेत पत्रातून दिले आहे.
या दिलेल्या दुसऱ्या स्मरणपत्र निवेदनात म्हटले आहे की, साकोली व सानगडी शाखेतील असंख्य गोरगरीब जनतेचे पैसे लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मध्ये कितीतरी कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. वारंवार आम्हाला पैसे देण्यासाठी तारीख दिली जात आहे. संबंधित संचालक मंडळ फोन उचलत नाहीत. सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. अश्यात सर्व शेतकरी खातेदारांना पैशाची नितांत आवश्यकता आहे. तरी या तीन दिवसात पैसे मिळाले नाही तर भंडारा येथे येऊन सर्व खातेदारांकडून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असा संतप्त इशारा दिला आहे. यातच जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे यांनी तातडीने बॅंक अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालक मंडळांच्या नावाने ०२/०७/२०२६ जिउनिभं./वि-२/पतसंस्था/तक्रार/४७७४/२०२६ असे तातडीने सर्व खातेदारांना पैसे देण्याचे आदेश पत्रच काढले. यात नमूद की, सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत करणे संस्थेला बंधनकारक आहे. व ०७ दिवसात या सर्व ठेवी परत कराव्यात. अन्यथा संबंधित संचालक मंडळ व व्यवस्थापक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ ( अ ) अन्वये आपणास निर्देश देत आहोत. हे पत्रात लिहिले आहे. यानंतर सर्व खातेदारांनी तेच निवेदन पत्र थेट प्रतिलीपित जिल्हाधिकारी भंडारा यांकडे सुद्धा देऊन आले.
हे दुसऱ्यांदा निवेदन देताना साकोली, सानगडी येथील भोजराम बांगडकर, संतोष पराते, प्रकाश रोकडे, विनोद गुप्ता, यशोधरा इलमकर, विजय साखरे, ज्योती दूबे, अरूण बन्सोड, मनोज कटनकार, आशा फंदे, दिलीप निनावे, गिता मेश्राम यांसह शंभराहून अधिक महिना पुरुष खातेदारांनी इशारा दिला आहे की, आदेशानंतर सुद्धा पैसे न मिळाल्यास साकोलीतून तीव्र आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल व याचे जबाबदार बॅंक संचालक मंडळ व प्रशासन राहील असा संतप्त पवित्रा घेतला होता.
◾अध्यक्ष दुरध्वनीवर काय बोलले --
"भंडारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शेकडोंच्या संख्येने खातेदार धडकले ही माहिती होताच पतसंस्था अध्यक्ष विलास वाघाये यांचा एका खातेदाराच्या मोबाईलवर फोन आला, त्यांनी सर्व महिला पुरुषांसमोर फोन स्पिकरवर टाकला तेव्हा ते बोलले की, सर्व जणांचे पैसे हे शनिवारी किंवा सोमवारी देत आहोत. लाखनीचे काही रक्कम देणे सुरू केले आहे. साकोली व सानगडीचे सुद्धा दोन चार दिवसात पैसे परत देऊन देऊ असे सर्वांसमोर ते बोलले. परंतु याअगोदर सुद्धा असेच वाक्य बोलून मागेही काही दिवसांचा अवधी देण्यात आला होता व त्या अवधीत सुद्धा कुणालाही ठेवी परत करण्यात आलेल्या नाहीत.
"महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० तरतुदी नुसार जनतेचे ठेवी ७ दिवसात परत करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा पतसंस्था संचालक मंडळांवर फौजदारी कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील. ठेवीदार जनतेने कोणतेही आंदोलन अथवा उपोषण करून नियमांचे उल्लंघन करू नका. आम्ही त्यांना ०७ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे"
-- शुध्दोधन कांबळे
"जिल्हा उपनिबंधक"
सहकार पणन, सहकारी संस्था कार्यालय भंडारा


0 टिप्पण्या