Ticker

6/recent/ticker-posts

महाराज, बोथे गुरुजींना जरा समजावून सांगा प्रेमकुमार बोके

 सुयोग ठाकरे तळेगाव दशासर जिल्हा अमरावती मो 7350714375

अमरावती -: वंदनीय महाराज, काल गुरुकुंज मोझरी आश्रमातील तुमच्या पवित्र समाधीवर मनोहर भिडे- कुळकर्णी नावाचा एक विकृत माणूस नौटंकी करून डोके टेकवून गेला.त्याच्या स्वागतासाठी गुरुकुंज सेवाश्रमातील काही प्रमुख मंडळी उपस्थित होती.त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड राग व आक्रोश आहे.हा भिडे अनेक वर्षापासून महाराष्ट्राचा जातीय-धार्मिक सलोखा उध्वस्त करण्याच्या मागे लागलेला आहे.कालही अमरावतीत येऊन त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अतिशय संतापजनक आणि चारित्र्यहनन करणारे वक्तव्य केले आहे.त्याचबरोबर सर्वधर्मसमभावाचा उपदेश हद्दपार केला पाहिजे असेही बेताल वक्तव्य त्याने केले आहे.यापूर्वी सुद्धा या नालायक माणसाने आमच्या अनेक संत महापुरुषांचा,माताभगिनींचा कित्येकदा जाहीर अपमान केलेला आहे.मनोहर भिडे कुलकर्णी हा महाराष्ट्राला लागलेली कीड व कलंक आहे.महाराष्ट्राच्या महान संत परंपरेला कलंकीत करण्याचे काम हा विकृत माणूस करीत आहे आणि गुरुकुंजातील लोक त्याचे स्वागत करण्यासाठी पायघड्या टाकत आहे. आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या समस्त गुरुदेवप्रेमींसाठी ही गोष्ट अत्यंत खेदाची आणि दुःखाची आहे.

                   परमपुज्य महाराज, गुरुकुंजतील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी विशेषता ज्यांच्या हातात कित्येक वर्षापासून संपूर्ण सत्ता एकवटलेली आहे ते मा.जनार्दन बोथे गुरुजी यांनी तुमचा विचार पायीदळी तुडवण्याचा विडाच उचललेला आहे की काय अशी शंका आता यायला लागली आहे.आपण संपूर्ण आयुष्यभर जनतेला राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.जनतेच्या उध्दारासाठी ग्रामगीता नावाचा अनमोल ग्रंथ लिहिला.त्याच मानवतावादी विचारांना उध्वस्त करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरणाऱ्या भिडेला जर गुरुकुंजातील मंडळी समाधीवर येण्याची परवानगी देत असेल तर ती तुमच्या विचारांसोबत केलेली प्रतारणा आहे.जनार्दन बोथे गुरुजींना त्याचे काहीच वाटत नाही कारण त्यांचे सगळे लक्ष सत्ता,संपत्ती आणि स्वार्थामध्ये गुंतलेले आहे.स्वतःच्या अनेक शाळा सुरू करून तुम्ही सुरु केलेल्या आश्रमशाळा सुद्धा त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेल्या आहेत.तसेच तुकारामदादा गीताचार्य यांनी लोकवर्गणीतून आणि लोकश्रमातून उभ्या केलेल्या व तुमच्या विचारांवर काम करणाऱ्या खऱ्या कृतीशील संस्था सुद्धा ताब्यात घेण्यासाठी फार मोठे कारस्थान बोथे गुरुजी करीत आहे.सच्च्या प्रचारकांना त्रास देणे, त्यांची बदनामी करणे, त्यांनी लोकसहभागातून मेहनतीने उभ्या केलेल्या संस्था खोटीनाटी कागदपत्रे तयार करून व अधिकाऱ्यांना प्रचंड लाच देऊन आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा अत्यंत कुटील आणि विकृत प्रयत्न बोथे गुरुजी करीत आहे.तसेच गुरुकुंज आश्रम हा सुध्दा तुमच्या मानवतावादी,विश्वकल्याणाच्या विचारांना तिलांजली देवून आता कट्टर हिंदुत्ववाद्यांचा आखाडा बनलेला आहे.त्यामुळे तुमच्या समतावादी विचारांना पूर्णपणे चुकीच्या दिशेने नेण्याचा घृणास्पद प्रयत्न बोथे गुरुजी आणि त्यांच्या चेलेचपाट्यांकडून होत आहे.

                    वंदनीय महाराज, मनोहर भिडे याने आपण ग्रामगीतेमधे सन्मानजनक स्थान दिलेल्या भगवान गौतम बुध्द,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज,संत तुकाराम महाराज,महात्मा गांधी यासारख्या अनेक संतमहापुरुषांचा वेळोवेळी अवमान केलेला आहे.राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत,भारतीय संविधान यांच्या विषयी अनेकदा आपल्या घाणेरड्या तोंडातून गरळ ओकलेली आहे.समाजातील एकोपा उध्वस्त करण्यासाठी दंगली घडविण्याचा प्रयत्न नेहमी हा भिडे करीत असतो.त्याला महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांची साथ आहे.ज्या अमरावती जिल्ह्याने कर्मयोगी गाडगेबाबा,भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि तुमच्या परिवर्तनवादी विचारांनी संपूर्ण देशभर नावलौकिक मिळविलेला आहे, तोच विचार नेस्तनाबूत करण्यासाठी भिडे अमरावतीमध्ये आला आणि बोथेंच्या लोकांनी त्याचे तुमच्या समाधीवर स्वागत केले ही गोष्ट तुमच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या लाखो सच्चा गुरुदेव प्रेमींना अतिशय वेदना देणारी आहे.महाराज,जनार्दन बोथे गुरुजींना कदाचित तुमचा सर्वधर्मसमभावाचा विचार मान्य नसावा ! राष्ट्रीय एकात्मतेवरील तुमच्या असंख्य भजनांचा बोथेंना विसर पडला असावा किंवा बोथे गुरुजींना आता तुमच्या विचारांची गरज नसावी ! कारण ते आता पूर्णपणे हिंदुत्ववाद्यांच्या कळपात सामील झाले आहेत.

                   वंदनीय महाराज, सर्वधर्मसमभावाची पेरणी करणाऱ्या लोकांविषयी अतिशय घाणेरडे वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडेंना तुमच्या समाधीवर आल्यानंतर परवानगी द्यायला नको होती आणि समजा तो आलाही असता तर त्याचे स्वागत करण्यासाठी तिथे उपस्थित राहण्याची बोथे पुत्राला काही गरज नव्हती.तसेही बोथे गुरुजींनी आपल्या समाधीचे पावित्र्य आधीच भंग केलेले आहे.आपण लिहून ठेवलेल्या घटनेतील कोणत्याच गोष्टी बोथे गुरूजी आचरणात आणत नाही.प्रचारक तयार करण्याकडे त्यांचे लक्ष नाही.तुमच्या साहित्याला घराघरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न नाही.केवळ राजकीय लोकांची हुजरेगिरी करून स्वतःचा स्वार्थ साधण्यातच बोथेंना स्वारस्य आहे.त्यामुळे महाराज, एक दिवस बोथे गुरुजींच्या स्वप्नात जाऊन त्यांना जरा समजावून सांगा ! सत्तेचा व संपत्तीचा मोह या उतारवयात सोडायला सांगा ! खऱ्या प्रचारकांचा आदर करायला शिकवा ! तुमचे लोककल्याणकारी विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जे लोक अहोरात्र झटतात, त्यांना त्रास देणे बंद करायला सांगा ! अन्यथा हे बोथे गुरुजी त्यांच्या हयातीतच तुमच्या विश्वव्यापी विचारांना धर्मांध,जात्यांध आणि कट्टरतावादी लोकांकडे गहाण ठेवल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की ! 
जयगुरू 

प्रेमकुमार बोके 
अंजनगाव सुर्जी
३० जुलै २०२३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या