• गडपेंढरी शेतशिवारातील घटना
• पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- रोवणीसाठी बांधीत उतरतांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने २ इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी(ता.२६) सकाळी ८:०० वाजताचे सुमारास गडपेंढरी शेतशिवारात घडली. मृतकाचे नाव दयाराम चोलीराम बोंद्रे(३५), मंगेश जयगोपाल गोंधळे(२६) दोघेही राहणार मेंढा/भूगाव, तालुका लाखनी असे आहे. लाखनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
सध्या धान रोवणी चा हंगाम सुरू असून मजूर मिळेनासे झाल्यामुळे इकडून तिकडून मजुरांची व्यवस्था करावी लागते. विष्णुदास गायधने राहणार गडपेंढरी यांच्या मालकीची १.४० हेक्टर आर शेतजमिनीतील रोवणीचे कंत्राट मेंढा/भूगाव येथील १६ महिला व १० पुरुषांनी घेतले होते. ते २५ जुलै पासून रोवणी चे कामासाठी येत होते. तसेच आजही(बुधवारी) सकाळी ७:३० वाजता दरम्यान शेतात हजार झाले. शेतातील बांध्यांमध्ये रोवण्यासाठी सर्व मजूर वेगवेगळ्या बांध्यांच्या धुऱ्यावरून उतरत होते. त्यापैकी दयाराम बोंद्रे व मंगेश गोंधळे हे बांधीत उतरत असलेल्या धुऱ्यालगत विहिरीमध्ये तोल जाऊन पडल्याने सोबत असलेला किशोर हजारे यांनी धावारे धावारे असा आवाज दिल्याने मुकादम नरेश गजबे व देवराम आंबेडारे यांनी विहिरीकडे जाऊन पाहिले असता दयाराम व मंगेश विहिरीत पडलेले होते. त्यांना वाचाविण्याकरिता सुधीर हजारे विहिरीतील ५ ते ६ पायऱ्या उतरला. पण घाबरल्याने सोबतच्या मजुरांनी विहिरीमध्ये साडी सोडून त्याला साडीला हात धरण्यास सांगून विहिरीबाहेर काढले. गडपेंढरी चे पोलिस पाटलांनी घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, पोलिस हवालदार गौरीशंकर कडव, दिगंबर तलमले, पोलिस शिपाई निशांत माटे, हरीश देवकाते, पियूष बाच्छिल घटनास्थळावर गेले. मजुरांच्या साहाय्याने विहिरीतील मृतदेह पाण्याबाहेर काढून घटनास्थळ पंचनामा केला व उत्तरीय परिक्षणासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आले. मुकादम नरेश गजबे यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील २ गरीब मजुरांच्या अकाली निधनाने मेंढा गावावर शोककळा पसरली आहे. कलम १७४ सीआरपीसी नुसार पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार दिगंबर तलमले तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या