• मुलीस जखमी करून केल्या ४ शेळ्या फस्त
• नागरिकांत भीतीचे वातावरण
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :-लाखनी येथील वन परिक्षेत्र कार्यालयाचे अधिनस्त सह वनक्षेत्र उमरझरीतील खैरी/वलमाझरी येथे बिबट्याने १० वर्षीय मुलीच्या मानेवर पंजा मारून जखमी केल्याची घटना सोमवारी(ता.१८) सायंकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. जखमी मुलीचे नाव रविना प्रभूदास मरस्कोल्हे तीचेवर उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचार सुरू आहे. तर पिंडकेपार येथे ४ शेळ्यांना बिबटाने फस्त केल्या या २ घटनामुळे पिंडकेपार परिसरात बिबटाचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उमरझरी सह वनक्षेत्र मोठ्या झाडाचा व पुरातन वनक्षेत्र म्हणून ख्याती प्राप्त असल्याने यात तृणभक्षी प्राण्यांसह हिंस्त्र प्राण्यांचा अधिवास आहे. शेती परवडेनासी झाली असल्यामुळे पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. सोमवारी खैरी शेतशिवारात १० वर्षीय मुलीला जखमी करून बिबट जवळच असलेल्या पिंडकेपार गावाकडे आपला मोर्चा वळवून पशुपालक भुमेश्वर नेवारे २, बूधाजी नेवारे १ आणि चैतराम लंजे यांची १. अशा ४ शेळ्या बिबटाने फस्त केल्यानंतर हेमराज पुस्तोडे यांचे गोठ्यात शिरला असता त्यास गावकऱ्यांनी डांबून ठेवून घटनेची माहिती वन विभाग व पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड, भंडारा चे वन परिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे, लाखनी चे वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले, उमरझरी चे क्षेत्र सहाय्यक प्रवीण ढोले, लाखनी चे क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले, साकोली चे क्षेत्र सहाय्यक सुनील खांडेकर परिसरातील सर्व वनरक्षक शूटरसह घटनास्थळी आले व बिबटाच्या रेस्क्यूसाठी पिंजरा मांडण्यात आला. पिंजऱ्याला २ खिडक्या होत्या. बिबट पिंजऱ्यात गेल्यानंतर १ खिडकी बंद करण्यात आली व नजर चुकीने दुसरी खिडकी खुली राहिल्याने त्यातून बिबट पसार झाला.
सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सायंकाळी व पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी अनेक महिला पुरुष गावातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर व्यायामासह भ्रमंती करतांना दिसत असतात. पण या बिबटाने २४ तासांत २ किलोमीटर चे परिसरात २ घटना केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यामुळे मानवासह पाळीव प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्यामुळे या बिबटाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. अशी मागणी होत असून क्षेत्र सहाय्यक प्रवीण ढोले यांनी रुग्णालयात जाऊन जखमी बलिकेची विचारपूस केली असून मृत शेळ्यांचे पंचनामे तयार करण्याचे काम सुरू होते. या बिबटाच्या शोधासाठी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढविली असून हा बिबट्या कुणाला दिसल्यास नागरिकांनी वन विभागाला कळविण्याचे आवाहन उमरझरी चे क्षेत्र सहाय्यक प्रवीण ढोले यांनी केले आहे.


0 टिप्पण्या