• मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा यांचे जनतेला आवाहन
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- नगर परिषद हद्दीतील अती धोकादायक असलेल्या सर्व शासकीय व खाजगी मालकीच्या इमारती ज्यांचा ३० वर्षापेक्षा जास्त बांधकाम कालावधी झाला आहे. अशा सर्व शासकीय व खाजगी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट कडून राहण्यास योग्य असल्याची खातरजमा करून तसा अहवाल नगर परिषद कार्यालयास सादर करण्याचे आवाहन भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी शहरवासियांना केले आहे.
पावसाळ्यात अतिवृष्टी अथवा भूस्खलनामुळे ठिकठिकाणी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. नगर परिषद हद्दीत काही धोकादायक इमारती व घरे आहेत. शहरामध्ये अतिवृष्टी होऊन काही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जमीन खचने, भूस्खलन इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी ज्या धोकादायक इमारती व घरे खड्ड्याच्या बाजूला अथवा डोंगर उतारावर, अथवा दरड कोसळण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी असल्यास अशा इमारतीत कोणीही वास्तव्य करू नये. धोकादायक इमारतींचा धोकादायक भाग तातडीने काढून त्या दुरुस्त कराव्या. ज्या इमारती दुरुस्त करूनही राहण्यास योग्य नाहीत त्या तात्काळ खाली कराव्यात व तिथे राहणाऱ्यांनी स्वतःची पर्यायी व्यवस्था करावी.
धोकादायक इमारतीमध्ये जर कोणी वास्तव्य करीत असेल त्यामुळे जीवितहानी झाल्यास त्यास नगर परिषद जबाबदार राहणार नाही. नगर परिषद हद्दीतील धोकादायक असलेले तथा ३० वर्षापेक्षा बांधकामाचा कालावधी जास्त असलेल्या सर्वच इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे व सदर इमारती वास्तव्यास योग्य असल्याची खातरजमा करून तसा अहवाल नगर परिषद कार्यालयास सादर करावा. असे महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १९६अ मधील तरतुदीनुसार भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी शहरवासियांना जाहीर आवाहन केले आहे.


0 टिप्पण्या