रुपाली डोंगरे चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर :-देशभरात शहरांची हवा स्वच्छ ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवले गेले. यानंतर वातावरणातील फरकाचा अभ्यास करून ठरवलेल्या वर्गवारीत छत्रपती संभाजीनगर शहराने राज्यात द्वितीय, तर देशात बारावा क्रमांक पटकावला.
या उपक्रमांसाठी महापालिकेला कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला होता. यातून वाहतूक बेटात नवीन कारंजे बसवणे व जुने कारंजे दुरुस्त करण्याचे काम, व्हर्टिकल गार्डन व अन्य कामे केली. हवा स्वच्छ ठेवण्यासाठी उचललेले पाऊल व योग्य ती माहिती वेळेवर पुरवल्यामुळे देशातील १२६ शहरांमध्ये जाहीर क्रमवारीत छत्रपती संभाजीनगरला १२ वे, तर राज्यात दुसरे स्थान मिळाले. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत प्राण पोर्टलच्या त्रैमासिक अहवालात महाराष्ट्रात ठाणे शहर प्रथम व छत्रपती संभाजीनगर द्वितीय आले. संभाजीनगरनंतर नवी मुंबई व नागपूर शहरांचा नंबर लागतो. उपायुक्त रवींद्र जोगदंड, उद्यान अधीक्षक विजय पाटील, स्वच्छ हवा कार्यक्रम सल्लागार गीतांजली कौशिक यांच्यासह विविध विभागांनी परिश्रम घेतले. आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात आले.


0 टिप्पण्या