रुपाली मेश्राम चित्रा न्युज
पंढरपुर : सध्या पंढरपुरातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन व संवर्धनाचे काम चालु आहे. हे काम चालु असताना सातशे वर्षापुर्वीचेच मंदिराचे बांधकाम ठेवले जाणार होते व यानंतरचे झालेले बांधकाम पाडले जाणार होते, दरम्यान आम्ही नवीन बांधकाम पाडल्यानंतर पुरातन वास्तुमध्ये कांही ऐतिहासिक अनमोल पुरातन ठेवा सापडला जाण्याची शक्यता वर्तवली होती. अखेर आज आमचा हा अंदाज खरा ठरला असुन श्रीविठ्ठलाच्या समोरच कान्होपात्रा मंदिरा शेजारील हनुमान गेटखाली एक तळघर आढळुन आले व या तळघरामध्ये दोन पुरातन मोठ्या मुर्ती, पुरातन नाणी, काचेच्या बांगड्या व अन्य मुर्ती आढळुन आल्या आहेत. जेंव्हा नव्हते चराचर। तेंव्हा होते पंढरपूर॥ या संतवचनानुसार भुवैकुंठ पंढरी नगरीचा इतिहास हा अतिशय प्राचीन असुन मंदिरात आणखी सुध्दा कांही पुरातन ठेवा सापडण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुरातत्व खात्याकडून याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे असुन यासंदर्भात मागील काळातच आम्ही मंदिरे समितीला व पुरातत्व खात्याला निवेदन देऊन मागणी केलेली होती. आता जोपर्यंत या तळघराचा संपुर्ण शोध होत नाही, तोपर्यंत श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरु करु नये. असे मत पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे.
पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभार्यासमोरील आढळलेलं तळघर उघडण्यात आलंय. पुरातत्त्व विभागाच्या अधिका-यांनी या तळघरात पाहणी केली. या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत.तर विष्णुबालाजीरुपातील 3 ते 4 फूट उंची असलेली मूर्ती तसेच अन्य एक मोठी मुर्ती सापडलीये. पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तू विशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते. त्यांना या दोन मुर्तीसह अन्य भग्नमूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत.
विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला. त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले. एक खोली सदृश्य वास्तू आढळल्याचे समजले. एक 6 बाय 6 फुटाचे चेंबर आहे. येथे एकूण 6 वस्तू आढळल्या. मातीच्या बांगड्या येथे सापडल्या. तसेच दगडाच्या मुर्त्या सापडल्या. हे तळघर आतून बंदीस्त आहे. त्या पलिकडे काही असेल असे वाटत नाही. तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुळ मंदिराखाली तळघरात प्रती विठ्ठल मंदिर असण्याची शक्यता
खरं तर आज आढळुन आलेल्या तळघरासारखेच मंदिराखाली अन्यत्रंही अनेक तळघर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मंदिर परिसरातील नागरिकांच्या अनेक पुरातन वास्तुंमध्ये अशी तळघरं आहेत. तर मंदिरातही असु शकतात. सध्याच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या खाली गर्भगृहात आणखी एक प्रती विठ्ठल मंदिर असु शकेल अशी चर्चाही आज पंढरपुरात ऐकावयास मिळत आहे, त्यामुळे पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांनी अतिशय सखोल असा अभ्यास याठिकाणी केला पाहिजे, अन्यत्रंही खोदकाम करुन आणखी कांही तळघरं आहेत का याचा शोध लावायला हरकत नाही. तमाम वारकरी सांप्रदायासाठी आजची ही घटना ऐतिहासिक व मौलिक असुन त्याच अनुषंगाने आणखी पुरातन वैभव समोर येण्याची शक्यता आहे, असे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे.
0 टिप्पण्या