• राष्ट्रीय महामार्ग ५३, जांभळी येथील घटना 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- शिकारीचे शोधार्थ वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग ५३(जुना ६) ओलांडणाऱ्या बिबट्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट जागीच ठार झाल्याची घटना रविवारी(ता.३०जून) मध्यरात्री १:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक बिबट नर जातीचा दीड वर्षे वयाचा होता. बिबटाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. जांभळी रोपवाटिकेत वन कर्मचाऱ्यांकडून मृतक बिबटास जाळण्यात आले. 
                       कोका वन्यजीव अभयारण्य व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे मध्यभागी जांभळी सहवनक्षेत्र असून राष्ट्रीय महामार्ग ५३ गेलेला आहे. याच सहवनक्षेत्रातून वन्य प्राण्यांचा भ्रमणमार्ग असल्यामुळे महामार्ग ओलांडून जावे लागते. महामार्ग ओलांडताना वाहनांच्या धडकेत अनेक वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रविवारी मध्यरात्री दरम्यान शिकारीचे शोधार्थ आलेला बिबट महामार्ग ओलांडून गावात शिरण्याचे प्रयत्नात असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट जागीच ठार झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग यांना मिळताच क्षणाचाही विलंब न करता सहकाऱ्यांसह ते घटनास्थळी दाखल झाले व वन विभागाला घटनेची माहिती दिली. उपवनसंरक्षक राहुल गवई यांचे मार्गदर्शनात प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे, वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले, क्षेत्र सहाय्यक एस.बी. उईके, वनरक्षक के.आर. वंजारी, मुंडीपार चे वनरक्षक राधेश्याम भराडे, निलागोंदी च्या वनरक्षक रुपाली राऊत, बरडकिन्हीचे वनरक्षक के.आर. साळवे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन मध्यवर्ती रोपवाटिका जांभळी येथे नेण्यात आला. सकाळी ९:०० वाजता पशुधन विकास अधिकारी डॉ. सव्वाशे, पशू वैद्यकिय अधिकारी हेडाऊ यांचेकरवी बिबटाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पशू वैद्यकिय अधिकारी वन कर्मचारी व मानद वन्यजीव संरक्षक यांचे प्रमुख उपस्थितीत बिबटाचा मृतदेह जाळण्यात आला. अज्ञात वाहनाच्या धडकेत वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याची मागील २ वर्षातील ही पाचवी घटना आहे. वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबद वन विभागाने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.