Ticker

6/recent/ticker-posts

डांभेविरली-गवराळा शिवारात वाघाची दहशत

• ३ बछड्यासह वाघिणीचे दर्शन 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- डांभेविरली-गवराळा रस्त्याने शेतकरी व शेतमजूर कामासाठी जात असतांनाही अचानक ३ बछड्यासह वाघिणीचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांसह मजुरांची तारांबळ उडाल्याची घटना रविवार(ता.३०जून) सकाळी ७:०० वाजता घडली. वन विभागाने वाघिणीसह बछड्यांना शेतशिवारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा. या करिता गावकऱ्यांकडून वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 
                      डांभेविरली हे गाव वैनगंगा नदी तीरावर तसेच भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वसलेले आहे. या गावातील शेतजमीन वैनगंगा नदीलगत असून पलीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुका आहे. वैनगंगा नदीपलीकडे "तपाळ" देवस्थान असून या देवस्थानात नवस फेडण्यासाठी कोंबडा, बकऱ्याचा बळी दिला जातो. त्यामुळे पट्टेदार वाघांचे वास्तव्य आहे. रविवारी सकाळचे सुमारास शेतकऱ्यांसह शेतमजूर डांभेविरली-गवराळा रस्त्याने जात असताना अचानक वाघिणीसह ३ बछडे दिसून आल्याने शेतकऱ्यांसह मजुराचीही तारांबळ उडाली. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांना देण्यात आली. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्तीचे प्रयत्न करूनही वाघिणीला शेतशिवारातून बाहेर काढण्यात अपयश आल्याने गावकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. ही बाब आजूबाजूचे गावात माहिती होताच वाघिनीसह बछड्यांना पाहण्यासाठी  ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिस बंदोबस्त लावावा लागला. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा. या करिता डांभेविरली येथील ग्रामपंचायत कमिटीसह गावकऱ्यांनी बैठक घेऊन उपवन संरक्षक भंडारा, सहाय्यक वनसंरक्षक साकोली तथा वन परिक्षेत्र अधिकारी लाखांदूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद प्रधान, माजी सरपंच दीपक बुराडे, पोलिस पाटील प्रधान, माजी सैनिक अर्जुन बुराडे, उपसरपंच उमेश देशमुख उपस्थित होते. वाघीण व बछड्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न होत आहेत. वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी सांगितले. यावेळी वनपाल सावसाकळे आणि वनरक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या