दिक्षा पाटील चित्रा न्युज
सोलापूर :-जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, सोलापूर यांनी शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व खाजगी रुग्णालयांना दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत. या निर्देशांमागील मुख्य उद्देश म्हणजे रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांबाबत स्पष्टता आणणे होय.

या संदर्भात, नायब तहसिलदार (गृह शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, खाजगी रुग्णालयांनी त्यांच्या प्रवेशद्वाराजवळ दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद यांची प्रत लावणे अत्यावश्यक ठरले आहे. यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरांची माहिती मिळेल आणि त्यांच्या हक्कांचे पालन होईल.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या आदेशानुसार, यापूर्वीच संबंधित खाजगी रुग्णालयांना या बाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र, अद्यापपर्यंत काही रुग्णालयांनी या आदेशाचे पालन केलेले नाही. यामुळे आता सर्व खाजगी रुग्णालयांना तात्काळ दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद लावण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच, या सूचनेची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास सादर करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.

सदर आदेशाची प्रत उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ, पुणे यांना आणि शिवसेना शहर प्रमुख श्री. दत्तात्रय भोसले यांना देखील पाठविण्यात आली आहे. या निर्णयामुळे रुग्णसेवा अधिक पारदर्शक होईल आणि रुग्णांच्या अधिकारांचे संरक्षण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.