राजेंद्र पातोडे : राज्यात छत्रपतींचा पुतळा सुरक्षित नाही.
रुपाली मेश्राम चित्रा न्युज
अकोला : नाैदल दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचा ४५ फुट उंच भव्य पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. अचानक काल हा पुतळा जमीनदोस्त झाल्याचा धक्कादायक आणि चीड आणणारी बातमीने संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे.
भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबरला साजरा होणारा नाैदल दिन सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने साजरा करण्याचे नियोजन सरकारने केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली १७ व्या शतकात बांधलेला हा किल्ला महाराजांचे आरमार आणि सागर सुरक्षेस दिलेल्या प्राधान्यातून निर्माण झालेला आहे. संतापाची लाट निर्माण झाली असताना सरकारी पातळीवर केलेल्या खुलासे पाहून जनतेच्या संतापात अधिकच भर पडली असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे.
पातोडे म्हणाले की, इतकी मोठी केंद्रीय आणि राज्याची सत्ता असताना देखील दर्जेदार, टिकावू स्मारक आणि पुतळा उभारला जात नाही, हे त्यापेक्षा अधिक गंभीर आहे. या पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य, त्यासाठीचा निधी, पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्या ठिकाणाच्या वातावरणाचा अभ्यास झाला होता का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मोठा पुतळा उभारण्यासाठी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी अपेक्षित असतो, मात्र नुसता श्रेय आणि फोटोसेशनसाठी घाई गडबडीत कार्यक्रम उरकवला गेला आहे.
पुतळ्या पेक्षा इतर बाबीवर खर्च करण्यात आला आहे.मालवणबाहेरील लोकांसाठी २६६ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी दाखल होणार्या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था तसेच वाहनतळ, मोठे मंडप, रोषणाई, लेझर शो करण्यात आले होते.त्याही पेक्षा धक्कादायक म्हणजे बांधकाम विभागाने पुतळ्याचे नट बोल्ड गंजले आहेत तसा पत्र व्यवहार नौदला बरोबर केला होता.मात्र त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे पातोडे यांनी म्हटले.
छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करणारी घटना घडल्या वर अद्याप देखील एकही अधिकारी कर्मचारी जबाबदार धरले गेले नाहीत, उलट वाऱ्या वर दोष टाकून राज्यकर्ते मोकळे झाले आहेत. छायाचित्रात दिसणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मी अकोल्यातील कपिलवस्तू नगर मध्ये २०१३ साली उभारला आहे. जमिनीपासून २४ फूट उंचीवर आणि १५ फूट उंचीचा पुतळा उभारताना स्थानिक मिस्त्री, मजूर यांना घेवून पुतळा उभारला आहे. किती तरी पावसाळे, जोराचे वारे आणि अकोल्यातील ४५ डिग्री पेक्षा अधिक उन्ह झेलत हा पुतळा दिमाखात उभा आहे.
आमच्या पेक्षा किती तरी भव्य आणि मोठे स्मारके पुतळे अनेक संस्था संघटना आणि इतरांनी राज्यात ठिकठिकाणी उभे केले आहेत. स्थानिक नागरिक जर दर्जेदार आणि टिकावू पुतळे उभारू शकतात तर एवढी मोठी सरकारी यंत्रणा अश्या ढिसाळ आणि भ्रष्ट पद्धतीने पुतळा कसा उभारू शकतात? सरकारने ह्या घटनेची दखल घेऊन दोषी अधिकारी कर्मचारी ह्यांना पाठीशी घालू नये. म्हणजे भविष्यात अश्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.


0 टिप्पण्या