Ticker

6/recent/ticker-posts

बार्शी विधानसभेला आनंद काशीद यांच्या उमेदवारीमुळे दिसणार वेगळी लाट, शेतकऱ्यांचा पाठिंबा

चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर :- बार्शी तालुक्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र बदलताना दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे, उपोषणासह संघर्ष करणारे आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे आनंद काशीद यांनी बार्शी विधानसभेला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असूनही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणीच्या माध्यमातून अर्जासाठी लागणारी डिपॉझिटची रक्कम उभी केली आहे. त्यामुळे काशीद यांच्या उमेदवारीमुळे बार्शीत एक नवा राजकीय पर्याय आणि वेगळी लाट तयार होत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांच्या मते, "आनंद काशीद हे सदैव सत्य आणि न्यायासाठी लढणारे कार्यकर्ते आहेत. त्यांचे काम आणि योगदान ओळखून आम्ही त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या काळात गोरगरिब, शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी अधिक काम होईल अशी आम्हाला खात्री आहे. त्यांची उमेदवारी ही परिवर्तनाची सुरुवात असेल."

या मदतीत अरुण घायतिडक, रवींद्र मुठाळ, विक्रम घायतिडक, शंकर देशमुख, नामदेव घायतिडक, अविनाश लोंढे, गुणवंत देशमुख यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. त्यांनी मिळून आनंद काशीद यांना उमेदवारी अर्जासाठी लागणारी डिपॉझिटची रक्कम एकत्र करून दिली.

आनंद काशीद यांनी शेतकऱ्यांच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले, "ही मदत माझ्यासाठी केवळ आर्थिक सहाय्य नाही, तर शेतकऱ्यांचा विश्वास आणि त्यांच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक आहे. मी सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहीन आणि गोरगरीबांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावीन."

यामुळे बार्शी तालुक्यातील राजकारणात नव्या उत्साहाची लाट उसळली असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वेगळ्या पर्यायाचा उदय होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या