जागरूक मतदार कार्यकर्ते म्हणून तुम्ही ठरवा कुणाच्या पाठीशी राहणार
चित्रा न्युज ब्युरो
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. या पक्षांच्या उमेदवार याद्या पाहिल्या तर यामध्ये घराणेशाही आणि कुटुंबशाहीला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. मात्र, या सगळ्याला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष अपवाद असल्याचे सुद्धा दिसत आहे. त्यामुळे एक जागरूक मतदार आणि कार्यकर्ते म्हणून या निवडणुकीत तुम्ही कुणाच्या पाठीशी राहणार हे ठरवण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने 99 जणांची नावे जाहीर केली. भाजपच्या या उमेदवार यादीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक नवीन चेहरे असले तरी यात राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे.
विनोद शेलार जे आशिष शेलार यांचे भाऊ आहेत त्यांना भाजपने मालाड पश्चिममधून उमेदवारी दिली आहे. भाजप नेते अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप, प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे, बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते, धनंजय महाडीक यांचे पुतणे अमल महाडीक यांच्यासह अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना भाजपने उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनीही भाजपचाच कित्ता गिरवल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव ठाकरे आणि काँग्रेस यांनीही घराणेशाही मजबूत करायचं कार्य केले आहे. बारामती मतदार संघात युगेंद्र पवार यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली आहे. ते अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत. तसेच कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते शरद पवार यांचे नातू आहेत. वरळीतून उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना ठाकरे गटातून उमेदवारी देण्यात आली, तर त्यांचेच मावस भाऊ वरुण सरदेसाई यांनाही वांद्रे पश्चिममधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सुद्धा याला अपवाद नसल्याचे दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडीने मात्र समाजातील सर्व घटकांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. घराणेशाही आणि कुटूंबशाही यांना छेद देत वंचित समूहांना उमेदवारी देत वंचितने एक आदर्श समोर ठेवल्याचे बोलले जात आहे. रावेरमधून तृतीयपंथी समुदायातील शमिभा पाटील यांना उमेदवारी देत वंचित बहुजन आघाडीने लोकशाहीवादी पक्ष असल्याचे दाखवून दिले आहे.
घराणेशाही आणि कुटुंबशाही यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार घराणेशाहीच्या बाजूने मतदान करणार का ? हे पाहावं लागणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनी स्वीकारलेल्या घराणेशाहीमुळे मतदारांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीसाठी आशादायक चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने पुन्हा जोर धरल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय समीकरण बदलणार का ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
---
0 टिप्पण्या