Ticker

6/recent/ticker-posts

सणासुदीच्या पार्श्वभुमिवर उलाढाली व देवाणघेवाणीवर कडक नजर;

निवडणूक आयोगाचे खर्चनिरीक्षक दाखलःयंत्रणांचा घेतला आढावा

चित्रा न्युज ब्युरो
छत्रपती संभाजीनगर:- विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहिता कालावधीत दिवाळीसारख्या सणासुदीचा कालावधी येत आहे. त्या पार्श्वभुमिवर होणाऱ्या उलाढाली व देवाणघेवाण यावर कडक नजर ठेवावी,असे निर्देश जिल्ह्यात दाखल झालेल्या निवडणूक आयोगाच्या खर्च निरीक्षकांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले. आज या निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व लेखाधिकारी तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय खर्च निरीक्षकांचे प्रशिक्षणही घेण्यात आले.

 नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, दाखल झालेले खर्च निरीक्षक कोटापट्टी वाम्शी क्रिष्णन व सोभान सुत्रधार यांच्यासह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक  डॉ. विनयकुमार राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपसंचालक तथा  वरिष्ठ कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी तसेच सर्व नोडल अधिकारी व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

 खर्च निरीक्षकांनी सर्व यंत्रणाप्रमुख व नोडल अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. निरीक्षकांनी मार्गदर्शन केले की, दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभुमिवर होत असलेल्या उलाढाली, भेटवस्तू देवाण घेवाण यासारख्या व्यवहारांवर नजर ठेवावी. त्यासाठी बॅंक खात्यांवर जमा होणाऱ्या व काढली जाणारी रोकड, ऑनलाईन होणारे व्यवहार, झिरो बॅलन्स खात्यांवर अचानक जमा होणाऱ्या रकमा, कपडे, दागिने, भेटवस्तूंच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या खरेदी अशा बाबींवर लक्ष ठेवावे. तसेच मद्यविक्री, रेल्वे, बस, विमानतळ याठिकाणी तसेच खाजगी वाहनांच्या तपासण्या कराव्या,असे निर्देश देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या