चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या विधानसभा पूर्वपिठीका माहिती पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, पोलीस उपायुक्त (शहर) दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी (महसूल) अमृत नाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, तसेच सर्व नोडल अधिकारी व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
या पुस्तिकेत 1990 पासून 2019 पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचा इतिहास, 2021 मध्ये झालेली पंढरपूर पोटनिवडणूक, विधानसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम, मतदारांची आकडेवारी, मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी, प्रचार सूचना, निवडणूक आचारसंहिता, पेड न्यूजविषयीच्या सूचना, प्रेस कौन्सिल मार्गदर्शक तत्वे आणि सोशल मीडियाचा वापर यासंबंधी आवश्यक माहिती देण्यात आली आहे. जिल्हा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी या माहिती पुस्तिकेचे संपादन केले असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे या कामात विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या माहिती पुस्तिकेचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, "विधानसभा निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि माहिती प्रसार सुनिश्चित करण्यासाठी ही पुस्तिका अतिशय उपयुक्त आहे, विशेषतः प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी."
0 टिप्पण्या