चित्रा न्युज ब्युरो
नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अविनाश भोसीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या( आरएसएस) प्रथमेश लाटकर या इसमाकडून धमकावण्यात आले आहे. तसेच ओबीसी आरक्षणाला विरोध करणारी वक्तव्य करत भोसीकर यांना जातीयवादी शिवीगाळ करण्यात आली आली आहे.
भोसीकर हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार होते. या निवडणुकीत त्यांना एक लाखांहून अधिक मते मिळाली होती. आता त्यांना पुन्हा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली. या मतदार संघातून भाजपकडून डॉ.संतुक हंबर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते काँग्रेसचे विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांचे मोठे बंधू आहेत. ओबीसी आरक्षणाच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. त्यात एक लाखांहून अधिक मतदार हा वंचित बहुजन आघाडीचा असल्याने भाजप आणि आरएसएस भयभीत झाल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले आहे.
याबाबत ग्रामीण पोलीस, नांदेड यांच्याकडे पोलीस तक्रार सुद्धा केली आहे. यामध्ये अविनाश भोसीकर यांनी फिर्याद देताना म्हटले आहे की, अज्ञात मोबाईल क्रमांकावरून दुपारी ३.५० वाजता त्यांना फोन आला होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून त्यांना ४.५० मिनिटांनी फोन आला आणि त्यामध्ये संजय राऊत यांचा निषेध का केला ? असे म्हणत ओबीसी आरक्षण विरोधी भाषा आणि जातीयवाचक शिवीगाळ केली. या आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावे असेही भोसीकर यांनी फिर्यादित म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओबीसी आरक्षण संपवायचे आहे आणि त्यामुळे आरएसएसच्या लोकांकडून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भीती दाखवण्यासाठी धमकावण्यात येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या ओबीसी उमेदवारांना आता धमक्यांचे फोन येत असल्याने ओबीसी समाजात आरक्षणावरून भीती निर्माण झाली आहे.
ओबीसी आरक्षणाचा लढा लढणाऱ्या प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ओबीसी उमेदवारांना आपला पाठींबा दिला आहे. ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरा आयोजित केला होता. आता अशा धमक्यांचे फोन येत असल्याने ओबीसी आरक्षण धोक्यात आलेय का ? अशी चर्चा सुरू झालीय.
----
0 टिप्पण्या