चित्रा न्युज प्रतिनिधी
तळोदा : अक्राणी महल येथे अक्काराणीचा महाल म्हणजेच किल्ला होता. अक्काराणीच्या नावावरून धडगांव तालुक्यास अक्राणी या नावाने संबोधले जाते.आजही अक्राणी हे महसूली नाव अनेक शासकीय दस्तऐवजवर दिसून येते.ज्या अक्राणी तालुक्याचे नाव अक्राणी महल या गावावरून पडले ,त्या गांवातील गांवक-यांना आजही तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ताच नाही.अक्राणी महल हे गांव तळोदा तालुक्यात येते.तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय,पोलीस ठाणे,न्यायालय इत्यादी तालुक्याची मुख्य कार्यालये ही तळोदा या तालुक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे अक्राणी महल या गांवातील गांवक-यांना विविध दाखले घ्यायला व शासकीय कामांसाठी तळोदा येथे जावे लागते.तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ता नसल्यामुळे गांवकरी अक्राणी महल ते धजापाणी असे ६ किलोमीटर डोंगरद-यातून बिकट वाटेने प्रवास करत धजापणी पर्यंत येतात व तेथून ३५ किलोमीटर अंतरावर तालुक्याचे ठिकाण गाठतात. तालुक्याच्या ठिकाणी ये जा करायला गांवक-यांचा अख्या दिवस प्रवासात जातो.अक्राणी महल या गांवक-यांना बाजारपेठ नसल्यामुळे तळोदा तालुक्यातील बोरद किंवा तळोदा येथेच जीवनावश्यक सामान खरेदी करायला जावे लागते.
अक्राणी महल पासून तळोदा येथे जाण्यासाठीची डोंगरद-यातली पायवाट ही अत्यंत धोकादायक आहे.या पायवाटेवरून दूचाकी किंवा सायकलही जाऊ शकत नाही.पायवाट इतकी धोकादायक आहे की,वाटसरूचे
पाय घसरला तर खोल दरीत कोसळून जीव जातो.उन्हा तान्हात चटके खात व पावसाळ्यात पाण्यात भिजत जीव घेणा प्रवास येथील ग्रामस्थ हजारो वर्षांपासून करीत आहेत. या गावाहून तालुक्याच्या ठिकाणी जोडणारा रस्ता करू ,करतो म्हणून लोकप्रतिनिधी ,आमदार, खासदार हे निवडणूकीच्या वेळी सांगून जातात. परंतू निवडणूक संपली की पुढा-यांनाही या रस्त्याचा विसर पडतो. पुढारी हे अनेक वर्षांपासून आमची फसवणूक करीत आलेले आहेत. आमचा रस्ता हा जैसे थेच आहे.त्यामुळे कधी कधी प्रवाशांना अक्राणी महल ते खांबला, काकडदा मार्गे शहादा हून तळोदा असा प्रवास करावा लागतो.परंतू अक्राणी महल ते खांबला जाणारा रस्ताही पूर्णपणे उखडला आहे,रस्त्यावरील सहा पूल तुटले आहेत.त्यामुळे त्या मार्गानेही जीव मुठीत धरून गांवकरी प्रवास करतात.अक्राणी महल ते धजापाणी रस्ता झाला पाहिजे,जेणेकरून तालुक्याच्या ठिकाणी तळोदा येथे जाण्यासाठी प्रवास सोयीस्कर होईल व रस्त्यामुळे अनेक समस्या सुटतील, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.अक्राणी महल गांव बिरसा फायटर्स टिमने डोंगरद-यातून तब्बल ३ तास पायपीट करीत गाठले व तेथील लोकांच्या रस्त्याबाबतच्या अडचणी समजून घेतल्या.अक्राणी महल येथील गांवक-यांना तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता व्हावा,म्हणून बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनास निवेदन देऊन पाठपुरावा करणार करावा व रस्त्याचा प्रश्न सोडवावा,आम्ही बिरसा फायटर्स संघटनेसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया गांवक-यांनी दिली.
0 टिप्पण्या