शासनाकडून व लोकप्रतिनिधीकडून अक्राणीमहल दुर्लक्षित- सुशिलकुमार पावरा
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार : अक्राणी महल किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यात यावे,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,वनसिंग पटले बिलीचापडा अध्यक्ष बिरसा फायटर्स, किसन वसावे, जयसिंग वसावे,जयसिंग वळवी,हाना पटले, माधव वसावे,सामाजिक कार्यकर्ते योगेश गावीत, रोहीदास वळवी,पंकज वळवी,अजय वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
अक्राणी हा पूर्वी परगणा होता.याला काही आख्यायिका आहेत. अक्राणी किल्ला हा महाराणा प्रताप यांच्या बहिणीने बांधला ,तिचे नाव अक्काराणी होते .तिच्या नावावरूनच या किल्ल्याला "अक्काराणीचा महल" असे नाव पडले.आज धडगांव तालुक्यास अक्राणी महल तालुका असे संबोधले जाते. राजवैभवाच्या खुणा आजही जपणारे अक्राणी हे ऐतिहासिक गाव नकाशात धडगांव तालुक्यात असले तरी गांवावर अंमल तळोदा तालुक्याचा आहे.अतिदुर्गम भागात सातपुड्याच्या कड्या कोपर्यात कोणतीही वाहतूक साधने नसतांना हा किल्ला बांधला गेला याचे आश्चर्य आहे.मोगलांची,होळकर-पेशव्यांची आणि ब्रिटीशांची आक्रमणे झेलत अक्राणी महल किल्ला भग्न अवस्थेत असला तरीही गतकाळातील इतिहासाची साक्ष देतो.
संपूर्ण विटांनी बांधलेल्या या किल्ल्याचा बुरूज व प्रवेशद्वार सुस्थितीत दिसला असला तरी दुर्लक्षित आहे.महालाच्या दक्षिण, पूर्व, पश्चिम दिशेच्या भिंती उभ्या असून ठिकठिकाणी पडझड झालेली आहे.महालाचा मुख्य भाग पडलेला असला तरी अवशेष राजपुतांचा राजेशाही थाट त्यांचा डामडौल याची साक्ष देतो.किल्ल्यात एक भुयार आहे.किल्ल्यातील जुन्या काळातील दगडी वस्तू भग्न अवस्थेत आहे. किल्ल्यात एक विहीर व सुंदर असे घोटीव व घडीव दगड वापरून बनवलेले मंदिराचे अवशेष आहेत. मंदिरातून अखंड पाण्याचा स्रोत वाहतो व तो संपूर्ण वर्षभर आटत नाही.मंदिरावर ठळक अक्षरात "राणी काजल मंदिर "असे लिहलेले आहे.या किल्ल्याच्या अवशेषात येथील आदिवासींना चांदी व तांब्याची नाणी सापडली,असेही सांगण्यात येते.नाण्यावर शाह असा उल्लेख असून काही नाण्यावर कुतुबुद्धीन असा उल्लेख आहे.
ऐतिहासिक वारसा जपणारा हा किल्ला पूर्ण पणे दुर्लक्षित आहे.शासनाकडून ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी करोडो निधी खर्च केला जातो.परंतू अक्राणी महल हा किल्ला अद्यापही शासनाकडून व लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्षित आहे.आदिवासी भागात ऐतिहासिक वारसा जपणारा हा किल्ला शासनाकडून जतन व संवर्धन केला गेला तर नंदूरबार जिल्ह्य़ात हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ होऊ शकते. आदिवासींना रोजगार मिळू शकतो.म्हणून अक्राणीमहल किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यात यावे.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या