Ticker

6/recent/ticker-posts

बार्शी तालुक्यात एकाच रात्रीत 7 पाणबुडी मोटर चोरीस – शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरींवर लावलेल्या तब्बल 7 पाणबुडी मोटर अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ही चोरी 11 मे रोजी दुपारी 3.30 वाजल्यापासून 12 मे रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंतच्या वेळेत घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी किरण विलास माने (वय 44, रा. आगळगाव) यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते आपल्या फिर्यादीत म्हणतात की, “मी बार्शी येथील प्राथमिक विद्या मंदिर प्रशालेत शिक्षक आहे. 11 मे रोजी सुट्टी असल्याने मी दुपारी 3.30 वाजता माझ्या शेतात गेलो होतो. तेव्हा विहिरीवर लावलेली पाणबुडी मोटर जागेवर होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 8.00 वाजता जेव्हा मी पुन्हा शेतात गेलो, तेव्हा मोटर गायब होती आणि पाईप कापलेला होता.”

या प्रकाराची माहिती शेजारील शेतकऱ्यांना दिल्यानंतर सहाजणांच्या पाणबुडी मोटरही चोरीस गेल्याचे समोर आले. शेतकऱ्यांनी मिळून मोटरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठलाही ठावठिकाणा न लागल्याने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली.

चोरीस गेलेल्या मोटरी व त्यांचे मालक आणि अंदाजित किंमत पुढीलप्रमाणे –

1 किरण विलास माने अॅन्सन 5HP - 8,000
2 नारायण हरिश्चंद्र थिटे पुनम + फाल्कन केबल 5HP 75 12,000
3 प्रकाश विठ्ठल माने सुपर टेक्समो 5HP - 9,000
4 प्रशांत जगन्नाथ माने हिरो 5HP 70 10,000
5 श्रीधर बलभिम काळे टेक्सनी 7.5HP - 10,000
6 राजू तानाजी थोरात अॅन्सन 5HP - 11,000
7 नितीन काशीनाथ माने स्पॅन्डर 5HP - 9,000
एकूण अंदाजित नुकसान     ₹69,000

या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध BNS कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून गुन्हे अन्वेषण सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांनी रात्रीची गस्त वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि पोलीस पाटील व गुप्त पोलिसांची नेमणूक करून सुरक्षा वाढवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

पोलीस प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून चोरट्यांचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे आश्वासन तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी दिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या