चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपुर : येथील नाभिक समाजातील नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणाऱ्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नाभिक युवा आघाडी, ब्रम्हपुरी यांच्यावतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण करणारा ठरला.
या कार्यक्रमात चि. हर्षल होमराज पगाडे याने ९४.२०% गुण मिळवून नेवजाबाई हितकारिणी विद्यालयातून प्रथम व नाभिक समाजातून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. तर चि. कृणाल प्रदीप सूर्यवंशी याने ८९.८०% गुण प्राप्त करून नाभिक समाजातून जिल्हात द्वितीय क्रमांक मिळवून समाजाचे नाव उज्ज्वल केले.
विशेष बाब म्हणजे, या दोन्ही विद्यार्थ्यांचे वडील सलून व्यवसायाशी संबंधित असून, त्यांनी आपली परिस्थिती विसरून शिक्षणाच्या क्षेत्रात अपार मेहनत, चिकाटी, जिद्द व आत्मविश्वास यांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यामुळेच हे यश केवळ शैक्षणिकच नाही तर सामाजिकदृष्ट्याही प्रेरणादायी ठरते.
“कैची-कंगवा ही ओळख असलेल्या नाभिक समाजाने आता शिक्षणाच्या गगनाला गवसणी घालण्यास सुरुवात केली आहे,” असे उद्गार या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
नाभिक समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी हर्षल व कृणाल यांच्याकडून प्रेरणा घेऊन उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करावी, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाची सुरवात नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत श्री नगाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालननाभिक युवा आघाडीचे कोष्याध्यक्ष पितांबर फुलबांधे यांनी केले तर प्रास्ताविक नाभिक युवा आघाडी चे अध्यक्ष लक्ष्मीकांत फुलबांधे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव सुनील मेश्राम यांनी केला. यावेळी कार्यक्रमा मंच्यावर उपस्थित नाभिक युवा आघाडीचे मुख्यमार्गदर्शक अजय खळशिंगे व प्रा लक्ष्मण मेश्राम सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी श्रावण येळणे आनंद सूर्यवंशी, विलास दाणे, सुरज कुंडले, मयूर मेश्राम, उदय पगाडे, रशमी पगाडे, विशाल दाणे, होमराज पगाडे आदी समाजबांधव उपस्थित होते.
तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता, नवीन जोमाने पुढे येत यश संपादन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
0 टिप्पण्या