१० वर्षांपासून मुली महिला शिक्षिकांपासून वंचित!
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :-अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळेत महिला शिक्षकांची नेमणूक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,तालुकाध्यक्ष अजय वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
अक्कलकुवा तालुक्यामध्ये निंबीपाडा ही १ ली ते ८ वी वर्ग असलेले शाळा असून या शाळेमध्ये जवळजवळ २२९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या २२९ विद्यार्थ्यांपैकी १३० या विद्यार्थिनी (मुली) आहेत. यापूर्वी दुर्गम भागात ही महिला शिक्षिका काम करत होत्या त्यामुळे पाचवी ते आठवी या वर्गामध्ये मुली शिकत असतांना मुलींच्या आरोग्य विषयक अडचणी समजून घेण्यामध्ये कोणती अडचणी येत नव्हत्या. परंतु मागील दोन वर्षापासून अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात १ली ते ८वी पर्यंत ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक बंद करण्यात आली आहे. शिक्षक संघटनेने महिलांना अवघड व दुर्गम भागात पदस्थापना देऊ नये करीता कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने आदेश दिला आणि दुर्गम भागातील जवळ जवळ ७९ महिला कर्मचारी यांना नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यातील सुगम भागात पदस्थापना देण्यात आल्या. तेव्हापासुन दुर्गम भागातील शाळेतील मुलींना महिला शिक्षिकांपासून वंचित रहावे लागत आहे.
मोठ्या शाळेत ५वी, ६वी,७वी व ८वी चे मोठे वर्ग असल्याने वयाने मोठ्या मुली शिक्षण घेत आहेत. त्या मुलीचे वैयक्तिक शारीरिक, भावनिक, सामाजिक प्रश्न वेगवेगळे असतात. सर्वच पालक सुशिक्षित नसुन बहुतांश पालक हे अडाणी व अज्ञानी आहेत. त्यामुळे ते आपल्या मुलींना व्यवस्थित समजून घेत नाहीत. निंबीपाडा सारख्या शाळेत २०१६ पासून म्हणजेच मागील ९ / १० वर्षांपासून एका ही महिला शिक्षिकेची नेमणूक करण्यात आलेली नाही. पुरुष शिक्षक कार्यरत असल्याने मुली त्यांच्याशी काही गोष्टी मनमोकळे पणाने चर्चा किंवा बोलू शकत नाहीत मुलींच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यात शिक्षकांना अडचणी येत असतात. डोंगराळ भागातील स्त्री शिक्षणाचा विचार करुन महिलांमध्ये व मुली मध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढण्यासाठी स्त्री शिक्षिकेची नियुक्ती होणे अत्यंत आवश्यक आहे. आमच्या भागात स्त्रीया व मुली राहत नाहीत काय? त्यांना केवळ पुरुषांनीच शिकवावे का? आज आमच्या परिसरात यापुर्वी प्रमाणे परिस्थिती नसुन केवळ ५% शाळा सोडल्यात तर ९५ % शाळांवर वाहनाची सोय व रस्त्याची सुविधा उपलब्ध असुन जर त्या गावात परिचारीका, अंगणवाडी कार्यकर्ती, सुपरवायझर, स्ञी वन कर्मचारी, एन.जी.ओ.च्या महिला कर्मचारी या भागात काम करतात व ज्या शिक्षणा मुळे स्त्रीयांचा विकास होणार आहे त्या शिक्षण क्षेत्रातील स्त्रीकर्मचाऱ्यांना का म्हणून नेमणूक दिली जात नाही. या प्रकारची विनंती आज डोंगराळ भागातील पालक करत आहे.म्हणून अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळांत महिला शिक्षकांची नेमणूक करावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या