विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, वृक्ष मित्र फाऊंडेशन, गुरुद्वारा लंगर साहेब व इतर सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हरित अभियान 2025 राबविले जात असून या अंतर्गत या वर्षी शहरात 26 हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
शनिवार, दि. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून केळी संशोधन केंद्र नांदेड येथे उपलब्ध असलेल्या सुरक्षित जागेत 501 पर्यावरणपूरक कडुनिंब व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात *जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त नितीन गाढवे, सहायक आयुक्त रावण सोनसळे, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अरविंद पांडागळे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ब्रम्हाकुमारी स्वाती बहेनजी, स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचा जन्मदिवस असल्याने मनपा क्रीडा अधिकारी रमेश चवरे व त्यांच्या विभागातील कर्मचारी यांनी दोन वर्षापासून कडुनिंबांच्या बियांपासून बनवण्यात आलेली 5000 कडुनिंबाची रोपे सर्वांना शहरात विविध ठिकाणी लागवड करण्यासाठी भेट दिली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी लोकसहभागातून वृक्ष लागवड व संगोपन कार्यासाठी प्रशासन सर्वोतपरी मदत करेल, असे आश्वासित केले. मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या कार्यक्रमास शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले की, सर्वांनी वृक्ष लागवड कार्यात सहभाग घ्यावा, संगोपनाची हमी दिल्यास महानगरपालिका तर्फे वृक्ष भेट देण्यात येतील. तसेच वृक्षांसाठी खड्डे करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाचे नियोजन करण्यात आलेले आहे, त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लागतील यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे सांगितले.
0 टिप्पण्या