चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाकडे प्राप्त अर्जांवर तात्काळ कार्यवाही करुन प्रकरण मंजुरीस पाठविले होते. हे प्रकरण अवघ्या 5 दिवसात मंजूर होऊन खंडलाय, ता. जि. धुळे येथील चि. शिव या तीन वर्षीय बालकावर हर्नियाची शस्त्रक्रिया निरामय हॉस्पिटल येथे यशस्वीपणे पार पडली. अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील यांनी दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 1 मे, 2025 पासून जिल्हास्तरीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे जिल्ह्यातील आर्थिकदृष्या गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कार्यान्वित आहे.
धुळे तालुक्यातील खंडालय येथील चि. शिव योगेश पाटील, वय 3 वर्ष, यास उजव्या बाजूला जन्मतः हर्निया असल्यामुळे शस्त्रक्रियेची गरज होती. परंतु घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्या कारणाने शस्रक्रियेचा खर्च परवडणारा नव्हता. याकरिता निरामय हॉस्पिटल, धुळे येथील संदर्भीत रुग्ण चि. शिव पाटील याच्या पालकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे अर्ज सादर केला होता. या कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील, कपिल पिवाल, प्रमोद बागूल यांनी तात्काळ प्रकरण तयार करून मंजुरीस पाठविले होते. हे प्रकरण अवघ्या 5 दिवसातच मंजूर झाल्याने चि. शिव याच्यावर त्वरीत उपचार सुरु झाले. या प्रकरणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे राज्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, डॉ. स्वानंद सोनार, वैद्यकीय समन्वयक वर्ग-1, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुंबई, डॉ. रितेश पाटील, राज्य समन्वयक, डॉ. मनोज विसपुते, जिल्हा समन्वयक यांनी मोलाचे सहकार्य केले.
राज्याचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेले मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे, येथील हे पहिलेच मंजूर प्रकरण आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी वैद्यकीय उपचार मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे या कक्षाशी संपर्क कराव. असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे अध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांनी केले आहे.
0 टिप्पण्या