चित्रा न्युज प्रतिनिधी
औरंगाबाद – शहरात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिद्धार्थ गार्डनमध्ये वेगवान वाऱ्यामुळे स्लॅब कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबादचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीने निवेदनात असा आरोप केला की, बीओटी (बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर) तत्वावर बांधण्यात आलेल्या सिद्धार्थ उद्यानात बांधकामदरम्यान गंभीर हलगर्जीपणा झाला, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. यासाठी संबंधित ठेकेदार, अभियंता आणि जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने या दुर्घटनेच्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत, मृत महिला कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई आणि सरकारी मदत तात्काळ देण्यात यावी, अशी विनंतीही निवेदनाद्वारे केली.
या निवेदनामुळे शहरात झालेल्या दुर्घटनेबाबत जनतेच्या मनातील अस्वस्थता आणि रोष शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला आहे.
0 टिप्पण्या