Ticker

6/recent/ticker-posts

माढा तालुक्यात उसाच्या शेतात सापडले मृतदेह, एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शेतीच्या वादातून थरारक हत्या!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-माढा तालुक्यातील मुंगशी गावात शेतीच्या वादातून थरारक हत्या घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ६२ वर्षीय लक्ष्मी उर्फ शोभा नारायण महाडीक यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून, याप्रकरणी त्यांच्या मुलगा, सून आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक ३० मे २०२५ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी घटनेच्या तपासाला गती दिली आहे.

फिर्यादी मारुती रामा रेवडे (वय ३६, रा. रेवडेवस्ती, ता. परांडा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांची आत्या लक्ष्मी उर्फ शोभा महाडीक यांची हत्या त्यांच्या स्वतःच्या शेतात उसाच्या सरीमध्ये करण्यात आली. त्यांच्या डोक्यात दगडाने जबर मारहाण करण्यात आली होती, तसेच गळा कपड्याने आवळण्यात आल्याचे दिसून आले. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

फिर्यादीचे म्हणणे आहे की, त्यांच्या आत्येची मुलगी कल्पना ढेरे ही सध्या ऑस्ट्रियामध्ये वास्तव्यास आहे. कल्पनाने व्हॉट्सॲप कॉलद्वारे कुटुंबीयांना माहिती दिली की तिच्या आईला कोणीतरी मारले आहे. हे ऐकून फिर्यादी मारुती रेवडे रात्री ११ वाजता मुंगशी येथे पोहोचले असता, स्थानिकांनी त्यांना उसाच्या शेतामध्ये शोध घेण्यास सांगितले. तेथेच लक्ष्मी महाडीक यांचा मृतदेह आढळून आला.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मृत लक्ष्मी महाडीक या त्यांचा मुलगा दत्तात्रय, सून रजनी आणि दत्तात्रय यांचा सासरा धर्मराज बागल यांच्याशी एकाच घरात राहत होत्या. सतत वाद होत असल्यामुळे त्या काही महिन्यांपासून पत्राशेडमध्ये वेगळ्या राहत होत्या. याआधी देखील त्या महिलेला मारहाण करण्यात आल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे.

या प्रकरणी कुईवाडी पोलीस ठाण्यात बी.एन.एस. संहितेच्या कलम 103(1), 3(5) अन्वये गुन्हा क्रमांक 0253/2025 नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार संशयित 1) दत्तात्रय नारायण महाडीक 2) रजनी दत्तात्रय महाडीक 3) धर्मराज बागल (रा. ब्रम्हगाव) यांनी शेतीच्या वादातून संगनमत करून ही हत्या केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर लगेचच पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांत खळबळ निर्माण झाली असून, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मृत महिलेच्या नातलगांनी आरोपींना त्वरित अटक करून न्याय देण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या