Ticker

6/recent/ticker-posts

श्री गणेश मूर्ती पुढील निर्माल्य (हार फुले दुर्वा फळे इत्यादी) संकलन करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती कार्यक्रम संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-शनिवार दिनांक ०६/०९/२०२५ रोजी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, तालुका- अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने आदरणीय डॉ.श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे अकलूज येथे श्री अनंत चतुर्दशी दिवशी घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या श्री गणेश मूर्ती पुढील निर्माल्य (हार फुले दुर्वा फळे इत्यादी) संकलन करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती कार्यक्रम संपन्न झाला.
सदर उपक्रमास प्रतिष्ठानच्या श्री बैठक अकलूज, बोरगाव, चाकोरे, महाळुंग, टेंभुर्णी, माळशिरस, देवळाली, मळोली, वेळापूर, केम व दहिवली येथील २८७ श्री सदस्यांनी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत निर्माल्य संकलन केले. 
अकलूज व परिसरातील घरगुती ७०३२ व सार्वजनिक मंडळाच्या १५३ श्री गणेश मूर्ती पुढील सुमारे ७५०० किलोग्राम निर्माल्य संकलन करण्यात आले. या कार्यास अकलूज शहर नगरपरिषदचे मुख्याकार्यकारी अधिकारी मा.श्री सुधीर गवळी, पाणीपुरवठा अभियंता मा.श्री महबूब शेख, विद्युत अभियंता मा.श्री पवन भानवसे, वाहन विभाग प्रमुख मा.श्री मनोज चव्हाण,शहर समन्वयक मा.श्री मनोज गवळी यांचे सहकार्य लाभले.
आपल्या धार्मिक परंपरेतून निर्माण होणारे फुले, माळा इत्यादी यांसारखे निर्माल्य पाण्यात विसर्जित केल्याने जल प्रदूषण होते ते होऊ नये यासाठी या छोट्याशा कृतीतून आपण पर्यावरण रक्षण, पर्यावरण स्वच्छता आणि समाज प्रबोधन साधतो. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य म्हणजे स्वच्छ, निरामय आणि सुसंस्कृत समाजाकडे टाकलेले मोलाचे पाऊल आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित निर्माल्य कलश हा उपक्रम केवळ धार्मिक भावना जपत नाही तर पर्यावरण संवर्धनाला ही चालना देतो. आपल्या सर्वांकडून हे निर्माल्य नद्यांमध्ये किंवा तलावात टाकले जाते, परिणामतः पवित्र जलस्तोत्र प्रदूषित होतात. जलिय जीवांना धोका निर्माण होतो आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. 
हा गंभीर प्रश्न ओळखून डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान "निर्माल्य कलश" या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. या कलशात जमा झालेले निर्माल्य थेट पाण्यात न टाकता त्याचा जैविक खतासाठी पुनर्वापर केला जातो. हे खत म्हणून प्रतिष्ठानने लावलेल्या वृक्ष लागवडीला वापरले जाते. आजच्या काळात स्वच्छता ही सेवा हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान केवळ धार्मिक संस्था नसून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यवर्धन व पर्यावरण संवर्धन यासाठी झटणारी समाजशक्ती आहे. 
या उपक्रमामुळे आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व समजते, पर्यावरणाचे रक्षण होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ निरोगी वातावरण तयार करण्याची संधी मिळते. 

आजपर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता अभियान, महाआरोग्य शिबीर,रक्तदान शिबिर, प्रौढ साक्षरता अभियान, व्यसनमुक्ती, जलाशय स्वच्छता, विहीर पुनर्भरण,शालेय पुस्तकांचे वाटप, कुरण व्यवस्थापन असे विविध उपक्रम अविरत सुरू आहेत. 

तसेच प्रतिष्ठान मार्फत आज पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा येथे सुद्धा निर्माल्य संकलनाचे कार्य करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या