चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-पहाटेच्या पारी हरिणाम बोला,
वासुदेव आला हो,वासुदेव आला. असे शब्द पुर्वीच्या काळी पहाटेच्या पारी कानावर पडायचे.पण आजच्या या हायफाय,व्हायफायच्या युगात हा आवाज ऐकू येईना आणि पहाटेच्या पारी वासुदेव ही दारावर येईना.सध्या ही कला आणि सुमधूर गाणे इंटरनेट च्या युगात कालबाह्य झाले आहे. अहो महादेवाच्या नावानं,अहो इठला च्या नावानं..सकाळच्यापारी वासुदेव आला दारी..धर्म पावला,अन् दान पावलं..असे म्हणत टाळ वाजवत पहाटेच्या पारी नाचत,गात येणारा वासुदेव आता हंडरगुळी परिसरात दिसेना झालाय.वासुदेव व वासुदेवा चे गाणे इतिहास जमा झाल्यागत आहे.
ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या जमान्यात हंडरगुळी (ता.उदगीर) परिसरातील खेड्यापाड्यात उगवणारी पहाट ही मोठी मनमोहक व प्रसन्न असायची. घराघरांमधून जात्यावर गाणे म्हणत माय-माऊल्या दळण दळायच्या. तसेच गडी,माणसं खांद्यावर कावड घेऊन आडावरुन पाणी आणायचे. आणि याच दरम्यान पहाटे अंगात विशिष्ट प्रकारचा सदरा व डोक्यावर मोरपंखांची टोपी घातलेला,पायात घुंगरु अन् हातात टाळ व बासरी घेऊन पहाटेच्या पारी वासुदेव आला, हरिणाम बोला.असे नाचत व गाणे म्हणत वासुदेव अंगणात येणा-या वासुदेवाला भाग्याची,नशीबाची गोष्ट समजले जायचे.
कारण,वासुदेवाच्या रुपाने पहाटे श्रीक्रष्ण घरात आल्याचा आनंद खेडेगावातील तेंव्हाच्या नागरीकांना व्हायचा.वासुदेव दिसला की लहान बच्चे वासुदेवाच्या सुर-तालावर नाच करायचे.आणि माय-माऊल्या घरी असेल ते धान्य आदली,पायली आन् सुपातून दान करुन त्याचे दर्शन घेत होते.पण आता हे सगळे इतिहास झाले असून आजकाल खेड्यातही भल्यापहाटेपासून महिला-पुरुष अन् युवक-युवती मोबाईल मध्ये एकदम बीझी दिसतात.तसेच आजच्या हाय फाय युवावर्गाला वासुदेव काय आहे. हेच माहित नाही.माञ असे असले तरीही हंडरगुळीतील कांही वासुदेव समाजातील मंडळी खेड्यापेक्षा उदगीर,अहमदपुर,देग्लूर,मुखेड ई. शहरी भागात आपली कला सादर करुन मिळेल ते कपडा-लता घेऊन येतात.


0 टिप्पण्या