Ticker

6/recent/ticker-posts

ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने बळीराजा दिन साजरा...इडा पिडा टळो बळीचे राज्य येऊ द्या चा दिला नारा...

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-बळीराजा म्हणजेच आपल्या सिंधू संस्कृतीचा महान सम्राट संविभागी राजा. बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाचे स्मरण करण्याची अखंड परंपरा ग्रामीण भागामध्ये आणि कष्टकरी शेतकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. दक्षिण भारतात तमिळनाडू आणि केरळ राज्यात बळीराजाचे अनेक सणांच्याप्रसंगी स्मरण करतात. सम्राट बळीराजा आमच्या सिंधूजनांचा अस्सल वारसा असून दरवर्षी भंडारा येथे पिपरी या गावी मोठ्या उत्साहाने बळीराजा उत्सवाचे बलिप्रतिपदेला आयोजन केले जाते. ग्रामीण भागामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात बळीराजा उत्सवाचे आयोजन केल्या जाते.  दि. २२ ऑक्टोबर २०२५ ला  बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता भंडारा येथे पिपरी या बळीराजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुरोगामी चळवळीतील मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून तथा बळीराजाच्या स्मरणार्थ विविध प्रकारचे पोवाडा आणि गीतगायन प्रस्तुत केले.  कार्यक्रमाच्या निमित्ताने ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते, शेतकरी भाऊ कातोरे, महिला अध्यक्ष शोभा बावणकर, प्राचार्य किरण मते, संयोजक जीवन भजनकर, आणि गावातील शेतकरी व शेतमजूर महिला व बाल गोपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. अलीकडल्या काळात बळीराजा आणि बळीवंशातील जे सर्व महानायक आहेत त्यांचे स्मरण मोठ्या प्रमाणामध्ये केले जाते. ज्यांना पुराणांमधून आणि वैदिक धर्मग्रंथांमधून दैत्य, दानव, राक्षस ठरवले ते आमचे पूर्वज आहेत. खऱ्या अर्थाने आमचे नायक आहेत. त्यांनी आपले जीवन वैदिकांशी कडवा मुकाबला करत समाजासाठी अर्पण केले. 
अशी आशा करून हजारो वर्षापासून आमच्या आया बहिणी दसरा आणि दिवाळीच्या सणाला बळीराजाची आठवण करत असतात. अशा बळीराजाचे स्मरणार्थ बळीराजा उत्सव साजरा करण्यात आला होता.
इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो अशी आराधना शेतकरी कष्टकरी बहुजन समाजातील खेड्यापाड्यातील स्त्रिया बलीप्रतिपदेच्या दिवशी तसेच भाऊबीजेच्या दिवशी करुन सर्वांना सुखी करणाऱ्या , सर्वांना समतेची वागणूक देणाऱ्या , सर्वांना समान संपत्तीचे वाटप करणाऱ्या बळीराजाची उत्कटतेने आठवण करतात. हा समतेचा, समृद्धीचा, न्यायाचा वारसा महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाने पुढे नेण्याचे काम केले. ग्रामीण कष्टकरी बहुजन समाजाने त्या स्मृती जपून ठेवल्याचे पहायला मिळते. महात्मा फुले यांच्याकडे आधुनिक काळातील बळीराजाचा अस्सल वैचारिक वारस म्हणून पाहिले जाते. त्यामुळे दरवर्षी हा बळीराजा उत्सव महात्मा फुले यांच्याशी जोडून साजरा केला जातो. असा उत्सव लोकांनी गावागावात, मोहल्ल्या मोहल्ल्यात साजरा केला पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या