Ticker

6/recent/ticker-posts

मुंडीपार : ॲम्बुलन्सला लागली आग... ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट!


संपूर्ण परिसर हादरला; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

गोंदिया वरून दुरुस्तीसाठी आणलेली पीएससी ॲम्बुलन्स वर्कशॉपमध्ये पेटली आग


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंडीपार (ता. गोरेगाव) :मुंडीपार–तेढा मार्गावरील मांडोदेवी वर्कशॉप येथे गुरुवारी दुपारी एक भीषण अपघाताची घटना घडली. प्राथमिक आरोग्य केंद्राची (पीएससी) ॲम्बुलन्स दुरुस्तीसाठी आणण्यात आली असता अचानक आग लागून ती काही क्षणांत जळून खाक झाली. दरम्यान, ॲम्बुलन्समध्ये ठेवलेला ऑक्सिजन सिलेंडर स्फोट झाल्याने मोठा आवाज होत संपूर्ण मुंडीपार परिसर हादरून गेला. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर ॲम्बुलन्स काही दिवसांपूर्वी बिघाड झाल्याने गोंदिया येथून टोचनद्वारे (टोचन वाहनाने बांधून) मुंडीपार येथील मांडोदेवी वर्कशॉपमध्ये आणण्यात आली होती. गाडी वर्कशॉपच्या परिसरात उभी केल्यानंतर अचानक इंजिनच्या भागातून धूर निघू लागला. काही क्षणातच आग पेट घेतली आणि ती वेगाने गाडीभर पसरली. याचवेळी आत असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला.

स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरातील नागरिक बाहेर पडून घटनास्थळी धावले. लगेचच मुंडीपार पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. ॲम्बुलन्स पूर्णपणे जळून खाक झाली असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

प्राथमिक तपासानुसार, गाडीच्या विद्युत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास मुंडीपार पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेनंतर काही काळ परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी वर्कशॉपमधील अन्य वाहनांना सुरक्षित स्थळी हलवून मोठा अनर्थ टाळला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या