Ticker

6/recent/ticker-posts

बांधकाम कामगार कल्याण निधीचा मोठा गैरवापर; ७९ लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :- जिल्ह्यात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करून सुमारे ७९ लाख ६९ हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगरचे कामगार उपायुक्त श्री. नि. पा. पाटणकर यांनी सहाय्यक कामगार आयुक्त, नांदेड यांना सदर घोटाळ्याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या तपासातून नांदेड कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर संगनमत करून मूळ बांधकाम कामगारांचा डेटा बदलत आर्थिक लाभासाठी बोगस नावे नोंदविल्याचे स्पष्ट झाले आहे.

तपासादरम्यान ८९४ मूळ बांधकाम कामगारांच्या नोंदींमध्ये फेरफार करून ९२६ अर्ज सादर करण्यात आल्याचे उघड झाले. यापैकी ५८९ अर्ज मंजूर करून त्यावर लाभ वितरित करण्यात आला, ज्यातून मोठ्या प्रमाणात निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल मंडळास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बेकायदेशीरपणे वितरित केलेली रक्कम तात्काळ वसूल करून मंडळाच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोषींवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची व केलेल्या कार्यवाहीची माहिती १५ दिवसांच्या आत सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

हा घोटाळा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड जिल्हा सचिव मंडळ सदस्य तसेच सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समोर आला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पुढील काळातही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या